आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराहरिसालच्या (आरएफओ) दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणात डीसीएफ विनोद शिवकुमारच्या अडचणींत वाढ झाली आहे. शिवकुमारविरुद्ध पूर्वीच आत्महत्येस प्रवृत्त करण्याच्या कलमान्वये गुन्हा दाखल झालेला आहे. दरम्यान दीपाली गर्भवती आहे, हे माहीत असतानाही विनोद शिवकुमारने त्यांना दोन दिवस पायी फिरवले. यामुळे त्यांचा गर्भपात झाला होता. ही बाब दीपाली यांनी मृत्यूपूर्व चिठ्ठीत लिहिली होती. आता पोलिसही तपासात ही बाब निष्पन्न झाल्यामुळे धारणी पोलिसांनी या गुन्ह्यात कलमे वाढवली आहेत. दीपाली चव्हाण या सेवेत कार्यरत असताना डीसीएफ शिवकुमार यांनी त्यांना वारंवार मानसिक त्रास दिला होता.
पोलिसांनी तपासादरम्यान दीपाली यांनी त्या वेळी केलेल्या औषधोपचाराची कागदपत्रे हस्तगत केली आहेत. तसेच काही साक्षीदारांचे जबाबसुद्धा नोंदवले आहेत. बारकाईने तपास केला असता शिवकुमार यानेच त्रास दिल्यामुळे दीपाली यांचा गर्भपात झाल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच शिवकुमारने दीपाली यांना अनेकदा शिवीगाळ करून निलंबित करण्याची तसेच गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन अपमानित केल्याचेही तपासात पुढे आले आहे. त्यामुळे धारणी पोलिसांनी आता विनोद शिवकुमारविरुद्ध पूर्वी दाखल असलेल्या गुन्ह्यात गर्भपातासाठी कारणीभूत ठरणे, धमकी देणे आदी कलमांची वाढ केली आहे. २५ मार्च २०२१ राेजी हरिसाल येथील शासकीय निवासस्थानी दीपाली यांनी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.