आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरातील किराणा, ड्रायफ्रूट व्यावसायिकाने पाठवलेल्या मालाची वसुली करून अमरावतीकडे येत असताना त्या व्यावसायिकाच्या कामगारांचे चारचाकी वाहन दरोडेखोरांनी अडवले. त्या वाहनातील तिघांना चाकू व तलवारीचा धाक दाखवला तसेच दगडफेक करून गाडीच्या काचा फोडल्या. त्यानंतर चाकू लावून वसुलीपोटी आलेली वाहनातील १३.५५ लाख रुपयांची रक्कम पाच दरोडेखोरांनी पळवली. ही घटना नांदगाव खंडेश्वर ते धानोरा गुरव गावादरम्यान १ जानेवारीला रात्री ११ वाजता घडली.
अमरावती शहरातील व्यावसायिक हाजी शादाब हाजी हरुण हे किराणा, ड्रायफ्रूटचे ठोक व्यापारी आहेत. ते यवतमाळ जिल्ह्यातही मालाचा पुरवठा करतात. त्यामुळे नेहमीच यवतमाळात माल पोहाेचवणे व मालाची रक्कम घेऊन येणे, या कामासाठी काही कामगार व एक बोलेरो पिकअप (एमएच २७ बीएक्स ४५०३) हे मालवाहू वाहन त्यांच्याकडे आहे. रविवारी दुपारी साडेबारा वाजता त्यांच्या वाहनावरील चालक इम्रान बेग गफ्फार बेग (३८, रा. नवीवस्ती, बडनेरा), वसुलीचे काम करणारे सुधीर लक्ष्मण सोळंके आणि अजीज अली रज्जाक अली हे तिघे यवतमाळला बोलेरो वाहनाने गेले होते.
यवतमाळला दिवसभर त्यांनी ज्या व्यापाऱ्यांना माल द्यायचा होता तो दिला, त्याचवेळी सुधीर साेळंके यांनी मालाची वसुली केली. दरम्यान रात्री साडेआठ ते नऊच्या सुमारास वसुलीची १३ लाख ५० हजार रुपयांची रक्कम लोखंडी पेटीत ठेवून वाहनातून ते यवतमाळातून अमरावतीला येण्यासाठी निघाले हाेते. नांदगाव खंडेश्वरपासून काही अंतरावर समोर आल्यानंतर त्यांच्या बोलेरोला एका पांढऱ्या रंगाच्या कारने ओव्हरटेक करत बोलेरो वाहनाला रस्त्याच्या एका कडेला दाबले. त्यामुळे बोलेरा रस्त्याच्या खाली उतरली. त्या कारमधून चार दरोडेखोर उतरले व त्यांनी सर्वप्रथम बोलेरोच्या काचा फोडल्या. तिघांजवळ चाकू व एकाकडे तलवार होती. त्यांनी बाेलेराेतील तिघांनाही धाक दाखवून रक्कम मागितली.
पाच हजारांची पिशवी दिली अन् दरोडेखोर चिडले सुरुवातीला दरोडेखोर बोलेरोजवळ आले व त्यांनी तिघांनाही रक्कम मागितली. त्यामुळे त्यांना एक पिशवी दिली, ही पिशवी घेऊन दरोडेखोर त्यांच्या कारमध्ये गेले, रक्कम पाहिली असता त्यामध्ये चार ते पाच हजार रुपयेच होते, ते पाहून दरोडेखोर चिडले. पुन्हा बोलेरोजवळ येऊन त्यांनी आणखी रक्कम कुठे आहे, चुपचाप काढून द्या, अशी धमकी दिली व त्यांनीच वाहनात रक्कम शोधली, त्यावेळी त्यांना लोखंडी पेटीत वसुलीची साडेतेरा लाखांची रक्कम मिळाली व ती रक्कम घेऊन पसार झाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.