आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुस्लिम बांधवांचा रमजान ईद सण शहरात मंगळवारी (दि. ३) मोठ्या उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी शहरासह तालुक्यातील शेकडोंच्या संख्येने आलेल्या मुस्लीम बांधवांनी ईदगाह मैदानावर सामूहिक नमाज पठण करत अल्लाहला साकडे घातले. या प्रसंगी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ठाणेदार मगन मेहते यांच्या मार्गदर्शनात पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात होता.
महिनाभर रमजानचे रोजे ठेवल्यानंतर मंगळवारी मुस्लिम बांधवांनी ईद-उल-फित्र उत्साहात साजरी केली. मुस्लिम धर्मातील अनेक उत्सवांमधील महत्त्वाचा उत्सव म्हणजे रमजान ईद. आपापसातील हेवेदावे व मत्सर विसरून सर्वांनी एकत्र यावे, असा संदेश या सणाने दिला. रमजान ईद म्हणजे जणू मानवी मनाचे दुवे साधण्याबरोबरच आत्मशुद्धीची शिकवण देणारा सण. ईदच्या नमाजासाठी ईदगाहमध्ये जाण्यापुर्वी दानधर्म करण्याचा संदेश मुस्लिम धर्मात देण्यात आला आहे.
त्यालाच सदका-एक-फित्र म्हणतात. ईद साजरी करत असतांना समाजातील दीनदुबळ्यांबाबत जाणीव असावी, हाच त्यामागचा उद्देश. त्याच अनुषंगाने अनेक शहरवासीयांनी गरीब व गरजूंना आर्थिक स्वरूपात मदत करूनच ईदच्या नमाजासाठी मंगळवारी ईदगाहवर प्रवेश केला. शहरातील ईदगाह मैदानावर सकाळी आठ वाजता मुख्य नमाज अदा करण्यासाठी शहर आणि परिसरातील अनेक मुस्लिम बांधवांनी गर्दी केली होती. यासोबत कुऱ्हा रोडवरील चौकातील मस्जिदमध्ये सुध्दा हाफीज फिरोज यांनी सकाळी सव्वा सहा वाजता ईदची नमाज पठण केली.
त्यानंतर शांततेसाठी दुआ करून एकमेकांची गळाभेट घेतली अन् ईदच्या शुभेच्छा देण्यात आल्या. ईदनिमित्त सकाळपासून मुस्लिम बांधव नवीन कपडे घालून नमाज अदा करण्यासाठी ईदगाह मैदानाकडे जात होते. दरम्यान, मौलाना शफिक यांच्या पाठीमागे सर्वांनी ईद-उल-फित्रची नमाज अदा केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.