आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संत गाडगेबाबांची आज पुण्यतिथी:अलोके, संसाराच्या चिखलातून भाईर निंग, जग तुई वाट पाहून रायलं!

अमरावती / जयंत सोनोने7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 92 वर्षीय नातू निवृत्ती महाराज सोनोने यांनी दिला आठवणींना उजाळा

मायबापहो….लुगडं कमी पैशाचं घ्या, पण लेकराईले शिक्षण द्या, अशी आग्रही भूमिका घेत अंधश्रद्धेने बरबटलेल्या समाजाचे दशसूत्रीतून संत गाडगे महाराजांनी लोकशिक्षण व प्रबोधन केले. आपल्या पश्चात हे कार्य अविरत चालण्यासाठी ‘अलोके, संसाराच्या चिखलातून भाईर निंग, जग तुई वाट पाहून रायलं’ असं म्हणत मोठी मुलगी अलोकाबाई यांना घराबाहेर पडून प्रबोधन करण्यासाठी प्रोत्साहित केले होते, अशी आठवण अलोकाबाईंचा धाकटा मुलगा निवृत्ती महाराज सोनोने (९२) यांनी सांगितली. संत गाडगेबाबा महाराजांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने त्यांनी ‘दिव्य मराठी’शी त्यांनी संवाद साधला.

संत गाडगेबाबा मितभाषी होते. महाराजांच्या वैचारिक दृष्टिकोनाची व्याप्ती अफाट होती. गाडगे महाराज अलोकाबाईंच्या घरी आल्यावर डोक्यावरील गाडग्यात जेवण करत. सोल्याची भाजी, मुगाच्या वड्या, कढी अन् भाकरी हे महाराजांचे आवडते पदार्थ. एकदा जेवणानंतर अलोकाबाईंनी हात पुसायला पदर देत असताना गाडगे महाराजांनी ‘अलोके, संसाराच्या चिखलातून भाईर निंग, जग तुई वाट पाहून रायलं’ असं म्हणत समाजाला प्रबोधन करण्यासाठी प्रोत्साहन दिले होते. मात्र सांसारिक जबाबदाऱ्यांचे ओझे पेलताना बाबांनी दिलेल्या प्रोत्साहनाकडे आईचे दुर्लक्ष होत गेल्याचे निवृत्ती महाराज सांगतात. गाडगेबाबांनी कधीच स्वत: जात चिकटू दिली नाही. म्हणूनच राज्यभरातील धर्मशाळांमध्ये विविध जाती, धर्माचे लोक काम करायचे. बाबांनी माणसातील माणुसकी जपत आपले कार्य पुढे नेले.

गाडगेबाबांनी उभारलेल्या कुठल्याही आश्रमात जातींचा नव्हे तर गुणवत्ता, शिक्षण व प्रामाणिकपणाच्या जोरावर कर्मचाऱ्यांना जबाबदाऱ्या देण्यात येत होत्या. लहान-मोठा, स्त्री-पुरुष असा भेद बाबांनी केला असं कधी त्यांच्या वागण्यातून दिसलं नाही. बाबा प्रत्येकाला अहो, काहो अशी सन्मानाने हाक मारत. त्यांनी लोककल्याणासाठी आश्रम उभारले, मात्र नातेवाईक तर सोडाच, स्वत:ही त्या ठिकाणी राहणे टाळायचे. ते धर्मशाळेबाहेर विसावा घ्यायचे.

राहण्यासाठी देतात पाच हजार
मुंबई येथे गाडगे महाराजांनी बांधलेल्या धर्मशाळेत निवृत्ती महाराज सोनोने सध्या वास्तव्यास आहेत. खोली नंबर पाचमध्ये दहा बाय दहाच्या खोलीत पाच लोकांच्या कुटुंबाचे वास्तव्य आहे. यात निवृत्ती महाराजांचा मुलगा, सून, नातू व नात राहतात. धर्मशाळेवर कोणताही हक्क न दाखवता निवृत्ती महाराज आजही महिन्याला ५ हजार रुपये भाडे देतात.

अलोकाबाईकडून घेतला शेतसारा
आपला आणि परका असा भेद बाबांनी कधीच केला नाही. अलोकाबाईंना गौरक्षणाची जमीन देण्याचा विषय निघाला त्या वेळी धर्मशाळेचे विश्वस्त अच्युतराव देशमुख यांना उद्देशून बाबा म्हणाले, जमीन वाहाला द्या, पण तिच्याकडून ‘लागवन’ घ्या, असे सांगून आलेली रक्कम धर्मशाळेच्या वहीखात्यात लिहिण्याचे त्यांनी आदेश दिले होते, असे निवृत्ती महाराज म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...