आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तीन महिन्यांपासून रखडल्या सेवा:अंबादेवी संस्थानच्या रुग्णालयासाठी जागेची शोधाशोध; गरिबांचे रुग्णालय बंद पडल्याने रुग्णांचे हाल

अमरावतीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

गरिबांचा दवाखाना म्हणून ओळख असलेले येथील अंबादेवी संस्थानचे रुग्णालय गेल्या तीन महिन्यांपासून बंद आहे. अंबादेवी रोडवरील डॉ. जोशी ट्रस्ट यांच्या भाड्याच्या जागेत हे रुग्णालय सुरू होते, परंतु जागेचा करारनामा वाढवून न मिळाल्यामुळे अचानक ते बंद करण्यात आले. एकाएकी ओढवलेल्या या संकटामुळे शहरातील गरीब रुग्णांची परवड होत असून त्यांच्यावर इतर रुग्णालयातील महागड्या सेवा घेण्याची वेळ ओढवली आहे. दुसरीकडे संस्थानने पर्यायी जागेचा शोध घेतला असून लवकरच रुग्णालय पूर्ववत सुरु करण्यात येईल, अशी तयारीही सुरू केली आहे.

सोनोग्राफी व एक्स रे सह रक्त, लघवी, थुंकीच्या वेगवेगळ्या चाचण्या आणि प्रत्येक रोगाचे निदान तसेच उपचार या रुग्णालयातून केले जातात. त्यामुळे शहराच्या बहुतांश मागास व अल्पसंख्यक भागातील नागरिक या दवाखान्यावर विसंबून आहेत. दररोज दीडशेवर चाचण्या आणि तेवढ्याच रुग्णांची ओपीडी अशाप्रकारे अडीचशे ते तीनशे रुग्णांना ही सेवा प्राप्त व्हायची. परंतु जागेच्या वादात सारेच ठप्प झाल्याने गरीबांच्या दवाखान्याला चक्क टाळे लागले आहेत. डॉ. जोशी ट्रस्ट व अंबादेवी संस्थान यांच्यात झालेल्या करारानुसार 1984 पासून हा दवाखाना सुरू झाला. पुढे 1991 साली उभय संस्थांमध्ये 30 वर्षांसाठी लेखी करार झाला. हा करार सन 2019 मध्ये संपला. परंतु त्यानंतर डॉ. जोशी ट्रस्टकडे विनंती करुनही मुदतवाढ मिळाली नाही. त्यामुळे फेब्रुवारीपासून रुग्णालयाच्या सेवा बंद कराव्या लागल्या, असे अंबादेवी संस्थानच्या विश्वस्तांचे म्हणणे आहे.

सदर रुग्णालय हे अमरावती शहरातील सर्वाधिक स्वस्त दरात विश्वासपात्र सेवा देणारे एकमेव रुग्णालय आहे. या रुग्णालयाकडे तीन कायमस्वरुपी डॉक्टर, डझनभर मानसेवी डॉक्टर, परिचारिका, तंत्रज्ञ, कक्षसेवक आणि प्रशासकीय कर्मचारी असा तब्बल 42 जणांचा स्टाफ आहे. वेगवेगळ्या चाचण्या व तपासण्यांखेरीज येथे नेत्र तपासणी, हृदय रोग तपासणी, चर्मरोग, अस्थिरोग, दंतरोग, शल्यचिकित्सा, अँक्युपंक्चर, कोरोना प्रतिबंधक लसीकरण आणि इतर सेवाही उपलब्ध आहेत.

पर्यायी रुग्णालय लवकरच

जागेचा भाडेपट्टा वाढवून न मिळाल्यामुळे मूळ मालकांनी रुग्णालयाच्या इमारतीला टाळेबंदी केली आहे. त्यामुळे आम्ही पर्यायी जागेचा शोध घेत आहोत. हा शोध लवकरच पूर्णत्वास जाणार असून, गरीब रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी पर्यायी जागेत रुग्णालय सुरू केले जाईल. दवाखाना बंद असल्यामुळे गरीब रुग्णांची प्रचंड गैरसोय होते, याची आम्हाला पूर्ण कल्पना आहे. त्याबद्दल आम्ही दिलगीर आहोत. असे अंबादेवी संस्थानचे सचिव रवींद्र कर्वे यांनी म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...