आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा:गुंगीचे औषध देऊन केला दुसरा विवाह; 24 वर्षीय युवतीच्या तक्रारीवरून गुन्हा

अमरावती17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पहिला विवाह झाला असल्याचे लपवून ठेवत एका २४ वर्षीय युवतीला गुंगीचे औषध देऊन अमरावतीत आणले व तिच्यासोबत एका विवाह संस्थेत लग्न केले. असा आरोप करून त्या २४ वर्षीय युवतीने नांदगाव खंडेश्वर पोलिस ठाण्यात विवाहित व्यक्तीविरुद्ध ३० एप्रिलला तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी तत्काळ त्या विवाहित व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

मनोज नानाजी मानतकर (रा. वाॅर्ड क्रमांक ६, नांदगाव खंडेश्वर) असे गुन्हा दाखल झालेल्या या विवाहित व्यक्तीचे नाव आहे. यामध्ये अन्य एका अनोळखीविरुद्ध देखील गुन्हा नोंदवण्यात आला. तरुणीच्या तक्रारीनुसार, २४ वर्षीय तरुणीची मनोज मानतकरसोबत ओळख होती. तिची शैक्षणिक कागदपत्रेदेखील त्याच्याजवळ होती. ती परत करतो, अशी बतावणी करून मनोजने बळजबरीने वाहनामध्ये बसवून अमरावतीला आणले. २८ एप्रिलला दुपारी १२ च्या सुमारास पीडितेला काही तरी गुंगीचे औषध दिले तसेच जिवे मारण्याची धमकी देऊन काही कागदपत्रांवर स्वाक्षरी घेतली. सायंकाळच्या सुमारास त्याने आपल्याला नांदगावात सोडल्याचे तरुणीने तक्रारीत म्हटले आहे.

अमरावतीहून परतल्यानंतर पीडित तरुणीला तिच्या व्हॉट्सॲपवर तिचे व मनोज मानतकरच्या लग्नाचे प्रमाणपत्र दिसले. त्यानंतर तिला २८ एप्रिलचा संपूर्ण घटनाक्रम लक्षात आला. मनोजने लग्नाची बतावणी करून लग्न प्रमाणपत्रावर सही घेतल्याचे तिच्या लक्षात आले. मनोज हा पूर्वीच विवाहित असताना आपल्याशी लग्न करून त्याने आपल्याला फसवल्याचे तिच्या लक्षात आले. या प्रकरणी २४ वर्षीय तरुणीने ३० एप्रिल रोजी नांदगाव खंडेश्वर पोलिस ठाणे गाठून त्याच्यासह अन्य एका अनोळखी व्यक्तीविरुद्ध तक्रार दिली.

बातम्या आणखी आहेत...