आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सभापती निवडणूक:निवड प्रक्रिया धामणगाव पंचायत समितीच्या उपसभापतीपदी जयश्री शेलोकार बिनविरोध

धामणगाव19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील पंचायत समितीच्या सभागृहात उपसभापतीपदाची निवडणूक बुधवारी (दि. १५) बिनविरोध पार पडली. यामध्ये जयश्री शेलोकार यांची उपसभापतीपदी निवड करण्यात आली. ओबीसी आरक्षण थांबल्याने पंचायत समितीमध्ये सभापतीऐवजी केवळ उपसभापती यांची निवड करण्यात आली असल्याने उपसभापती शेलोकार यांनाच पंचायत समितीच्या सभापती पदाचा प्रभार देण्यात आला आहे. बुधवारी दुपारी दोनच्या सुमारास निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार प्रदीप शेलार यांच्या उपस्थित पंचायत समितीच्या सभागृहात उपसभापती पदाची निवड प्रक्रिया पार पडली. या वेळी सभागृहात पंचायत समिती सदस्य जयश्री शेलोकार, शुभम भोंगे, बेबी उइके, जयश्री ढोले, माधुरी दुधे व महादेव सोमोसे या सहा सदस्यांची उपस्थिती होती. भाजपचे दोन सदस्य गैरहजर असल्याने निवड प्रक्रियेत सर्वानुमते जयश्री शेलोकार यांची उपसभापती पदावर निवड करण्यात आली आहे. अडीच वर्षांपूर्वी डिसेंबर २०१९ मध्ये पंचायत समितीच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले होते. दरम्यान तालुक्यातील ८ गणांमध्ये झालेल्या निवडणुकीत काँग्रेसचे ६, तर भाजपचे २ उमेदवार विजयी झाले होते. त्या वेळी पंचायत समितीच्या सभापती पदावर काँग्रेसचे महादेव सोमोसे, तर उपसभापती माधुरी दुधे यांची अविरोध निवड झाली होती. अडीच वर्षानंतर पुन्हा एकदा सत्ता पक्षात असलेल्या जयश्री शेलोकार यांची उपसभापती म्हणून निवड करण्यात आली. माजी आमदार वीरेंद्र जगताप यांनी प्रभारी सभापती शेलोकार व सदस्यांचे अभिनंदन केले. या वेळी जगताप यांच्यासह जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती सुरेश निमकर, जिल्हा बँकेचे संचालक श्रीकांत गावंडे, तालुकाध्यक्ष रविष बीरे, शहराध्यक्ष नितीन कनोजिया, माजी जि. प. सदस्य मोहन घुसळीकर, अविनाश मंडवगणे, मुकूंद माहुरे, सुनील भोगे, बबलु भेंडे व काँग्रेस कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. उपसभापतींकडे सभापती पदाचा प्रभार : पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती यांचा कार्यकाळ २४ जून रोजी संपुष्टात येत आहे. त्यामुळे ही निवडणूक झाली होती. ओबीसी आरक्षणाचा प्रश्न रखडल्याने पंचायत समित्यांचे सभापती कोणत्या संवर्गात निवडावे हे कठीण झाले होते. परिणामी सभापतिपदाची निवड न घेता उपसभापती पदाची निवडणूक घेतल्याने उपसभापती शेलोकार यांनाच प्रभारी सभापती म्हणून कारभार चालवण्याची संधी मिळाली. जयश्री शेलोकार यांचे अभिनंदन व स्वागत करताना माजी आमदारांसह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते. चांदूर रेल्वे पं. स. उपसभापतीपदी शुभांगी खंडारे जयश्री शेलोकार

उपसभापतींना प्रभारी सभापती म्हणून कार्यभार पाहण्याची संधी

पंचायत समितीच्या उपसभापतीपदाची निवडणूक बुधवारी पार पडली. एकाच उमेदवाराचे नामनिर्देशन पत्र विहित वेळेत प्राप्त झाले आणि ते वैध ठरले. त्यामुळे भाजपच्या शुभांगी खंडारे यांची उपसभापतीपदी बिनविरोध निवड करण्यात आली. बुधवारी झालेल्या उपसभापती पदासाठी अन्य कुणीही नामनिर्देशन केले नव्हते. पंचायत समितीमध्ये पक्षीय बलाबल पाहिले असता ४ सदस्य भाजप व दोन सदस्य काँग्रेसचे आहेत. या पुर्वी सभापती पदी सरिता देशमुख आणि उपसभापतीपदी प्रतिभा डांगे होत्या. अडीच वर्षांनंतर बुधवारी झालेल्या उपसभापती पदाच्या निवडणुकीत शुभांगी खंडारे यांना उपसभापती म्हणून निवड झाल्याचे घोषित करण्यात आले. सभापती पदासाठी आरक्षण घोषित नसल्यामुळे हे पद रिक्त ठेवण्यात आले आहे. त्यामुळे उपसभापतीच सभापतीचा प्रभारी म्हणून कार्यभार सांभाळतील. निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडली. उपस्थितांनी नवनियुक्त उपसभापतींचे अभिनंदन करीत त्यांच्या विजयाचा जल्लोष केला.

बातम्या आणखी आहेत...