आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराविधान परिषदेच्या पदवीधर मतदारसंघ निवडणुकीने सिनेटच्या नामनिर्देशनासाठी भलताच पेचप्रसंग उभा झाला आहे. त्यामुळेच आता या विद्यापीठावरील नामनिर्देशन 30 जानेवारीनंतरच घोषित होतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. वेगवेगळ्या क्षेत्रात नामवंत असलेल्या दहा सदस्यांना नामनिर्देशित करण्याचे अधिकार राज्यपालांना देण्यात आले असून कुलगुरुंनाही सिनेटवर तीन सदस्यांना नामनिर्देशित करण्याचे स्वातंत्र आहे.
राज्यातील बहुतेक विद्यापीठावर पाठवावयाच्या राज्यपालनामित सदस्यांची घोषणा झाली असतानाही संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ मागे पडले आहे. या विद्यापीठाच्या सिनेट सदस्यांची पहिली बैठक आगामी 10 फेब्रुवारी रोजी होत आहे. या बैठकीची तारीख घोषित करतानाच राजभवनातून नामनिर्देशित सदस्यांची यादीही घोषित होईल, असे अनेकांचे भाकीत होते. परंतु तसे झाले नाही. राजभवनातून केवळ सिनेट बैठकीची तारीख घोषित झाली, नामनिर्देशित सदस्यांची नावे नाहीत.
यामागे सद्या सुरु असलेली निवडणुकीची लगीनघाई कारणीभूत आहे. मुळात या निवडणुकीची आचारसंहिता सुरु होण्यापूर्वीच राज्यपालांद्वारे नामनिर्देशित करावयाच्या सदस्यांचा मुद्दा उपस्थित झाला होता. विद्यापीठ प्रशासनाच्यावतीने तसा मसुदाही राजभवनाकडे पाठविण्यात आला होता. परंतु निवडणुकीआधी नावांची घोषणा केल्यास त्याचा परिणाम निवडणुकीवर होऊ शकतो, हे लक्षात आल्याने संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ वगळता इतर सर्व विद्यापीठांतील नामनिर्देशित सदस्यांची नावे घोषित केली गेली. विद्यापीठ वर्तुळातील जाणकारांच्या मते विधान परिषदेच्या निवडणुकीचे मतदान पार पडताच ही यादी घोषित केली जाईल. मतदान 30 जानेवारीला असल्याने कदाचित त्या दिवशी किंवा निकालाची वाट न पाहता त्यापुढच्या एक-दोन दिवसांत ती विद्यापीठ प्रशासनाकडे पोहोचली असेल.
शब्द कुणाबाबत खरा? तेव्हाच कळेल
सूत्रांच्या माहितीनुसार विधान परिषद निवडणूक लढत असलेल्या एका उमेदवाराने आपले राजकीय वजन वापरुन काही जणांना शब्द दिला आहे. आता हा शब्द किती प्रतिनिधींबाबत खरा ठरतो, हे संभाव्य यादी जोपर्यंत विद्यापीठ प्रशासनाला प्राप्त होत नाही, तोपर्यंत स्पष्ट होणार नाही. त्यामुळेच सारेच त्या यादीची प्रतीक्षा करीत आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.