आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खाकी वर्दीतील संवेदनशीलता:फिर्याद देणाऱ्या वृद्धाचे हाड तुटलेले, पोलिसांनी दाखवली खर्चाची तयारी; डॉक्टरांचे मोफत उपचार

अमरावतीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मारहाणीची फिर्याद घेऊन पोलिस स्टेशनला आलेले साठ वर्षीय गृहस्थ राम साने यांची तक्रार नोंदवून घेताना पोलिसांच्या असे लक्षात आले की या गृहस्थाच्या हातामध्ये प्रचंड वेदना होत आहेत. त्यामुळे ते रिपोर्ट लिहू शकत नव्हते. किंवा तोंडी सांगूही शकत नव्हते. पोलिसांनी या व्यक्तीच्या संंपूर्ण उपचाराची जबाबदारी घेत त्यांच्या मोडलेल्या हाडाचे ऑपरेशनही करवले.

त्यांच्या वेदना खाकी वर्दीतील पोलिसांनी जाणून घेतल्या आणि त्यांच्या ‘खाकी’तील माणूस जागा झाला. या वृद्ध व्यक्तीला दिलासा देण्याकरिता पोलिसांनी त्यांना हॉस्पिटलकडे जाण्याचा सल्ला दिला. परंतु खिशात दमडी नसताना हॉस्पिटलचा खर्च कसा करणार ? या विवंचनेमुळे ते गृहस्थ दवाखान्यात जाऊन उपचार घेण्यास टाळाटाळ करीत होते.

खर्च पोलिस वर्गणीतून

ठाण्यात उपस्थित पोलिस सचिन भाकरे व मिलिंद वाटाणे ही बाब ठाणेदार प्रदीप चौगावकर यांच्यापर्यंत पोहोचविली. त्यांनी लगेच फिर्याद देण्यासाठी पोचलेल्या त्या व्यक्तीला दवाखान्यात जाण्याचा सल्ला दिला. शिवाय उपचाराचा खर्च आपण पोलिस वर्गणीतून करू, असे आश्वासनही दिले.

एक्सरेनंतर हाड मोडल्याचे लक्षात आले

ठाणेदार चौगावकर एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी आपल्या वाहनात बसवून त्या व्यक्तीला मातोश्री हॉस्पिटलमध्ये नेण्याची व्यवस्था केली. तेथील डॉक्टर महेंद्र राऊत यांना जेव्हा वास्तविकता कळाली, तेव्हा त्यांनीही मानवतेचे दर्शन देत मोफत उपचार करण्याची तयारी दर्शवली. आणि त्या व्यक्तीचा एक्स-रे काढला. एक्सरेनंतर सदर व्यक्तीच्या हाताचे हाड अक्षरश: मोडल्याचे लक्षात आले.

डॉक्टरांचे मोफत उपचार

त्यामुळे लगेच ऑपरेशनची तयारी करुन पुढील औषधोपचार सुरु करण्यात आला. विशेष असे की डॉक्टरांनी त्यासाठी एकही रुपया घेतला नाही. त्यांनी संपूर्ण उपचार मोफत केला. त्यांच्या या कामगिरीबद्दल पोलिसांनी त्यांचे मनोमन आभार व्यक्त करीत अभिनंदन केले.

समज खोटा ठरविला

सर्वसाधारणपणे पोलिस म्हटले की त्यांना कुठल्याही प्रकारचा दयाभाव नाही, असे चित्र डोळ्यासमोर आणले जाते. परंतु या खाकी वर्दीच्या आतही एक माणसाचे संवेदनशील हृदय आहे, याचा परिचय आज वरुडवासीयांना आला. त्याबद्दल पोलिसांसह डॉक्टरांचेही अभिनंदन केले जात आहे.

बातम्या आणखी आहेत...