आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागणेशोत्सवाला एक महिना वेळ असला तरीही सार्वजनिक मंडळांसोबतच घरगुती गणेश मूर्ती घडवण्याची प्रक्रिया मूर्तिकारांकडून सुरू झाली आहे. या वर्षी शहरातील अडीचशे ते तीनशे कलावंतांनी सव्वा ते दीड लाख घरगुती गणेश मूर्ती तयार केल्या असून, या मूर्तीवर अंतिम हात फिरवण्याचे काम सद्या सुरू आहेत. यंदा माती व रंगांच्या किमतीत चांगलीच वाढ झाल्यामुळे मागील वर्षीच्या तुलनेत मातीच्या गणेश मूर्तींच्या किमती २० टक्क्यांनी वाढणार असल्याचे मूर्तिकारांनी सांगितले. अमरावती शहर व जिल्ह्यात गणेशोत्सव उत्साहात साजरा केला जातो.
विशेष म्हणजे शहरातील तीनशे मूर्तिकार कलावंत मातीच्या मूर्ती तयार करतात. मागील वर्षी शहरात मातीच्या सव्वा लाख मूर्ती तयार केल्या होत्या. मात्र यंदा अधिक मूर्ती तयार करण्यात येत आहेत. सलग दोन वर्षे गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट होते. यंदा गणेशोत्सव कोरोनापूर्वी व्हायचा त्या पद्धतीने होणार असल्याचे चित्र आहे. शहरातील अडीचशे ते तीनशे मूर्तिकारांनी गणेशोत्सवासाठी मागील काही महिन्यांपासूनच मूर्ती तयार करत असून सद्या रंगरंगोटीचे सुरू आहे. गणेशोत्सवाला अजून ३५ दिवस वेळ आहे. तरी मूर्तिकारांची लगबग सुरू झाली आहे.
अमरावती शहरात मोठ्या प्रमाणात मूर्ती तयार होत असल्या तरी मूर्तीसाठी आवश्यक असलेली माती नागपूर, रायपूर, जबलपूर आदी ठिकाणांहून आणली जाते. मागील वर्षी एक ब्रास माती अमरावतीत येईपर्यंत ६ ते ७ हजार रुपये खर्च येत होता. यंदा हाच खर्च साडेआठ ते नऊ हजार रुपयांवर पोहाेचला आहे.
मातीच्या मूर्तींमध्ये ५ वर्षांत तिप्पट वाढ
२०१६ मध्ये सुमारे २० हजारांच्या आसपास मातीच्या मूर्ती विक्री व्हायच्या. मात्र गेल्या ५ ते ६ वर्षांत मातीच्या मूर्तींची मागणी वाढली असून यंदा ६० ते ७० हजार मूर्ती विक्रीसाठी लागणार आहेत. यावरून पर्यावरणपूरक गणेशोत्सवाकडे गणेश भक्तांचा कल वाढला असल्याचे दिसते.
५० हजार मूर्ती जातात परजिल्ह्यात
काही वर्षांपासून शहरात तयार होणाऱ्या मूर्तींना लगतच्या अकोला, वर्धा, नागपूर, मध्य प्रदेशातील बैतूल, छिंदवाडा या जिल्ह्यांसह जबलपूर, रायपूर आदी शहरांत मागणी आहे. त्यामुळे यंदाही ४० ते ५० हजार मातीच्या गणेश मूर्ती या जिल्ह्यांत विक्रीसाठी जाणार आहेत. उत्सवाच्या दहा दिवसांपूर्वी या मूर्ती घेऊन जातात.
यंदा ‘आपला गणपती आपल्या हाताने’ उपक्रम
बडनेरा येथील रहिवासी व भाजपचे प्रदेश प्रवक्ते शिवराय कुलकर्णी हे मागील काही वर्षांपासून पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला चालना मिळावी म्हणून मातीचे गणपती तयार करण्याचे भाविकांना विनामूल्य प्रशिक्षण देतात. कोरोनामुळे दोन वर्षे त्यांना प्रशिक्षण देता आले नाही. मात्र यंदा पुढील काही दिवसांत दोन ते तीन ठिकाणी भाविकांना मातीचे गणपती तयार करणे शिकवणार असल्याचे शिवराय कुलकर्णी यांनी सांगितले.
पीओपी मूर्तीवर पूर्णत: बंदी असावी
पर्यापूरण गणेशोत्सवासाठी आम्ही मागील दहा वर्षांपासून प्रयत्न करतो आहे. बहुतांश भविकही मातीच्याच मूर्ती खरेदी करतात. जिल्ह्यालगतच्या काही जिल्ह्यांमध्ये पीओपी मूर्तीवर पूर्णत: बंदी आहे. त्याप्रमाणे आपल्या शहर व जिल्ह्यातही पीओपी मूर्तीवर पूर्णपणे बंदी आणून त्याची प्रभावी अंमलबजावणी करावी. शहरात अडीचशे ते तीनशे मूर्तिकार असून, यंदा सव्वा लाख मातीच्या गणेश मूर्ती तयार होत आहेत.
- कैलाश रोतडे, सचिव, कुंभार माती-कला सुधार समिती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.