आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बांधकाम मंजुरीची डोकेदुखी वाढली:'बीपीएमएस' पोर्टल प्रणालीत अनेक तांत्रिक उणिवा; बांधकाम व्यावसायिकांची तक्रार

अमरावती3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

घर, इमारत, प्लॅट, व्यावसायिक प्रतिष्ठान, व्यापारी संकुलाच्या बांधकाम परवानगीसाठी राज्य शासनाने जानेवारी 2022 मध्ये बिल्डींग प्लॅन मॅनेजमेंट सिस्टीम (बीपीएमएस) हे पोर्टल वापरण्याचे महापालिकांना निर्देश दिले. बांधकाम परवानगीसाठी आधी वापरली जाणारी आ‌ॅटो डिसीआर प्रणाली बंद करून मनपाने बीपीएमएस पोर्टल वापरण्यास सुरुवात केली. त्यानंतर या प्रणालीत अनेक तांत्रिक उणिवा असल्याच्या तक्रारी बांधकाम व्यावसायिकांनी केल्या आहेत.

या आहेत समस्या

घराचा नकाशा मंजूर होण्यास उशीर लागणे, बांधकामाचे क्षेत्रफळ चुकीचे दर्शविणे, रक्कम भरल्यास त्याबाबत संदेश न मिळणे, प्रस्ताव सादर करताना तांत्रिक अडथळे येणे, बराच वेळ डेटा न स्विकारणे अशा अडचणींमुळे बांधकाम व्यवसायिकांसोबतच सर्वसामान्यांपुढे अडचणी निर्माण झाल्या असून त्यांची डोकेदुखी वाढली आहे. कारण घराचे स्वप्न पूर्ण होण्यास उशीर लागत आहे.

बांधकाम व्यावसायिकांनी मनपा आयुक्तांकडेही बीपीएमएस प्रणालीबाबत तक्रार केली होती. सोबतच नवे बांधकाम प्रस्तावच मंजुरीसाठी मनपाकडे सादर करायचे नाहीत, असा निर्णयही घेतला होता. परंतु, मनपा आयुक्तांच्या मध्यस्थीमुळे तसेच बीपीएमएस पोर्टलच्या साॅफ्टवेअरमध्ये काही सुधारणा केल्याने कसेबसे काम सुरू झाले. परंतु, त्यानंतरही अडचणी कायम असून त्यामुळे सर्वसामान्यांची डोकेदुखी वाढली आहे. जे काम आधी एका आठवड्यात व्हायचे, त्यासाठी आता किमान दोन आठवडे ते एक महिन्याचा कालावधी लागतो. साहजिकच बांधकाम परवानगीतून मनपाला होणारे उत्पन्नही घटले आहे.

एकतर ऑफलाईन पद्धतीने बांधकाम परवानगी द्यावी, बीपीएमएस प्रणाली ऐवजी जुनीच ऑटो डीसीआर प्रणाली कायम ठेवावी किंवा बीपीएमएस प्रणालीतील सर्व तांत्रिक उणीवा तत्काळ दूर कराव्यात, अशी मागणी बांधकाम व्यावसायिकांसह सर्वसामान्यांद्वारे शासनासह मनपाकडे करण्यात आली आहे.

जानेवारी ते जून या कालावधीत बांधकाम परवानगीसाठी 1 हजार 483 प्रकरणे मनपाकडे आली. त्यापैकी 1 हजार 112 प्रकरणांना परवानगी मिळाली. भुखंडांच्या विभागणीची 664 प्रकरणे आली. त्यापैकी 577 तसेच सुधारित बांधकामांच्या 39 पैकी 29 प्रकरणांनाच मंजुरी मिळाली. जुन्या आटो डीसीआर पद्धतीच्या तुलनेत जर ही आकडेवारी बघितली तर निम्मी आहे. कारण ऑटो डीसीआर पद्धतीत या तुलनेत वेगाने काम व्हायचे, अशी माहिती बांधकाम व्यावसायिकांनी दिली आहे.

या तांत्रिक उणीवा

  1. बीपीएमएस प्रणाली सहज प्रस्ताव स्विकारीत नाही. यासाठी उशीर लागतो.
  2. प्रणाली बराच वेळ डेटाही स्विकारीत नाही.
  3. दर आठवड्याला प्रणाली अपडेट होते. त्यामुळे पोर्टल अपडेट करण्यासाठी पूर्ण दिवस लागतो.
  4. बरेचदा रक्कम भरल्याची नोंदच दाखवित नाही. सतत पाठपुरावा केल्यानंतर रक्कम जमा झाल्याची माहिती मिळते.
  5. बीपीएमएस पोर्टलमुळे स्थापत्य अभियंत्यांची कटकट वाढली, कामाचा वेग मंदावला.
बातम्या आणखी आहेत...