आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्यातील वडनेर गंगाई येथील नागरिकांना मजिप्रच्या नियोजनशून्य कारभारामुळे ऐन उन्हाळ्यात भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. येवदा येथील पाण्याच्या टाकीवरून येवदा, वडनेर गंगाईसह आजूबाजूच्या दहा-अकरा गावांना पाणीपुरवठा केला जातो. एकाच टाकीवरून पाणी सोडले जात असताना इतर गावांना एक ते दोन दिवसाआड मात्र वडनेर गंगाईला पाच ते सहा दिवसानंतर पाणी पुरवठा केला जात आहे.
त्यामुळे याला जबाबदार कुणी वरिष्ठ अधिकारी आहे की कर्मचारी, असा गंभीर प्रश्न संतप्त ग्रामस्थांना पडला आहे. सध्या शहानूर धरणात मुबलक जलसाठा आहे. परंतु तरीही पाणीटंचाई का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळेच मजिप्राने योग्य नियोजन करित तातडीने पाणी समस्या मार्गी लावण्याची मागणी जोर धरत आहे.
वडनेर गावातील पाणी टंचाईची समस्या सुटावी व नियमित पाणीपुरवठा व्हावा, यासाठी पंधरा दिवसांपूर्वी उपसरपंच मोहिनी हुतके व ग्रामस्थांनी आंदोलन केले होते. दरम्यान या आंदोलनानंतरही जीवन प्राधिकरणाने पाणीपुरवठा सुरळीत केला नाही. परिणामी ग्रामस्थांचे भर उन्हाळ्यात अतोनात हाल होत असून महिलावर्गाला पाण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. तर दुसरीकडे केवळ दोन अधिकार्यांच्या भरवशावर मजीप्राचा कारभार चालत आहे.
या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने अधिकारी-कर्मचाऱ्यांची पुरेशी भरती करावी, अशी मागणी युवक काँग्रेसचे सागर देशमुख यांनी केली असून याबाबत ते लवकरच आमदार बळवंत वानखडे व मजीप्राचे वरिष्ठ अधिकारी यांना भेटणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.