आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमरावती गार्डन क्लबचा उपक्रम:पुष्पप्रेमींसाठी 3 दिवसीय शेवंती पुष्प महोत्सव; सोमवारपासून होणार महोत्सवाला प्रारंभ

अमरावतीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

विविधरंगी तसेच विविध प्रकारच्या शेवंती फुलझाडांचा प्रसार व्हावा या उद्देशाने अमरावती गार्डन क्लबद्वारा शहरामध्ये दरवर्षी फक्त शेवंती पुष्पांच्या कार्यशाळा तसेच पुष्पप्रदर्शन आयोजित करण्यात येते. या वर्षीही हा तीन दिवसीय महोत्सव राबविण्यात येत असून त्याला सोमवारपासून (दि. 19) प्रारंभ होत आहे. अमरावती गार्डन क्लब व श्री शिवाजी उद्यानविद्या महाविद्यालयाचा संयुक्त सहकार्याने शेवंती पुष्प प्रदर्शनी व स्पर्धेचेदेखील आयोजन करण्यात आले आहे.

श्री शिवाजी उद्यानविद्या महाविद्यालय, रामपुरी कॅम्प, अमरावती येथे होणाऱ्या या शेवंती पुष्प प्रदर्शनाचे उद्घाटन श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष अ‍ॅड. गजानन पुंडकर यांच्या अध्यक्षतेखाली माजी मंत्री सुनील देशमुख, यांच्या हस्ते सोमवारी दुपारी बारा वाजता करण्यात येईल. ही पुष्प प्रदर्शन सर्व नागरिकांसाठी बुधवारपर्यंत (दि. 21) सकाळी दहा ते रात्री नऊ वाजेपर्यंत खुली राहणार असून बुधवारी सायंकाळी सहा वाजता बक्षीस वितरण समारंभ होईल.

या पुष्प प्रदर्शनीमध्ये सुंदर आणि मनमोहक शेवंतीचे सौंदर्य अनुभवण्यासोबतच अमरावती तसेच इतर शहरातील पुष्पप्रेमींना आपल्या घरच्या बगीच्यातील फुललेल्या शेवंतीचे सौंदर्य समस्त जनतेपर्यंत पोहोचविण्याची आणि त्या माध्यमातून आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधी या निमित्ताने उपलब्ध होणार आहे. या पुष्प प्रदर्शनात सहभागी होण्यास उत्सुक असणाऱ्या निसर्ग प्रेमींसाठी आपल्या कुंड्या (15 पेक्षा जास्त असल्यास) प्रदर्शन स्थळी नेण्याआणण्याची जबाबदारी आयोजकांकडून पार पाडण्यात येते. स्पर्धेत सहभाग होवू इच्छिणाऱ्या नागरिकांनी त्यांची नोंद रविवारी (दि. 18) सकाळी नऊ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत प्रदर्शनस्थळी स्वतः नोंदवावी. अमरावती परीक्षेत्रातील सर्व निसर्गप्रेमी नागरिक, विद्यार्थी व महिलांनी प्रदर्शनास अवश्य भेट द्यावी असे आवाहन अमरावती गार्डन क्लबचे अध्यक्ष, डॉ.दिनेश खेडकर व कोषाध्यक्ष, प्राचार्य डॉ. शशांक देशमुख आणि सचिव डॉ.रे खा मग्गीरवार यांनी केले आहे.

विजेते स्पर्धक होतील या पुरस्कारांनी सन्मानित

शेवंती पुष्प प्रदर्शनीदरम्यान विजेत्या स्पर्धकांना प्रा. एम. एम. शहा स्मृती शेवंती चषक, प्रा. सुभाष मुजुमदार स्मृती शेवंती चषक तसेच संपूर्ण प्रदर्शनातील सर्वोत्कृष्ट ठरणाऱ्या शेवंतीला स्व. गोवर्धनराव देशमुख स्मृती क्वीन ऑफ द शो चषकाने सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...