आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यार्थ्यांना आता वैश्विक शिक्षणाच्या संधी:शिवाजी शिक्षण संस्थेचा अमेरिकन सीजीईसोबत करार

अमरावतीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती येथील श्री. शिवाजी शिक्षण संस्थेने अमेरिका येथील कन्सॉर्टिअम फॉर ग्लोबल एज्युकेशन (सीजीई) या संस्थेसोबत सामंजस्य करार (एमओयू) केल्याने सदर संस्थेतील विद्यार्थी व प्राध्यापकांना आता वैश्वीक शिक्षणाच्या संधी प्राप्त होणार आहेत. संस्थाध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांच्या मार्गदर्शनात संस्थेच्या कार्यकारी परिषदेचे सदस्य हेमंत काळमेघ आणि सचिव डॉ. व्ही. जी. ठाकरे यांनी शनिवारी रात्री नागपुर येथे या करारावर स्वाक्षरी केली.

या करारामुळे सदर संस्थेतील विद्यार्थी व शिक्षक-प्राध्यापक सात देशांमधील 40 विद्यापीठे आणि महाविद्यालयांसोबत जोडण्यात आले आहेत. त्यामुळे त्यांना खऱ्या अर्थाने ग्लोबल शिक्षणाच्या संधी उपलब्ध होणार आहेत. विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय पातळीवर शैक्षणिक देवाण-घेवाण करण्यासाठी या कराराचा मोठा फायदा होईल, असे संस्थेचे म्हणणे आहे. श्री. शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांच्या सूचनेनुसार कार्यकारिणी सदस्य हेमंत काळमेघ व सचिव डॉ. व्ही. जी. ठाकरे यांनी सीजीईच्या अध्यक्षा डॉ. कॅरोलिन बिशप यांच्याशी नागपूर येथील हॉटेल सेंटर पाईंट येथे ग्लोबल एज्युकेशन एमओयूबाबत चर्चा केली. त्यानंतर दोन्ही संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी या सांमजस्य करारावर स्वाक्षरी केली.

यावेळी विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. सुखदेव थोरात, वेलँड बॅप्टिस्ट युनिव्हर्सिटीचे अध्यक्ष डॉ. बॉबी हॉल, वेलँड बॅप्टिस्ट युनिव्हर्सिटीच्या ग्लोबल प्रोजेक्ट्सचे संचालक डॉ. डॉन अ‍ॅशले, अँडरसन विद्यापीठाचे एमबीए संचालक डॉ. जेनेव्ही मूर, कॅम्पबेल विद्यापीठाच्या ग्लोबल एंगेजमेंटच्या डीन डॉ. डोना वाल्ड्रॉन, सीजीईचे सल्लागार डेव्हिड बिशप, डीबी विद्यापीठाचे डॉ. बॉब गॅरेट आणि रेव्ह. नितीन सरदार प्रामुख्याने उपस्थित होते. सीजीई या संस्थेचे जाळे खूप विस्तारलेले आहे. यूएसएमधील 39 युनिव्हर्सिटी/कॉलेज कॅम्पस आणि 90 पेक्षा जास्त राष्ट्रांसह धोरणात्मक शैक्षणिक आणि सामायिकरणाच्या संधी असलेल्या ७ देशांमधील संस्था त्यांच्या सदस्य आहेत. या सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये सुसज्ज वर्गखोल्या, नर्सिंग व बिझनेसमधील विशेष अभ्यासक्रम असून विद्यार्थ्यांना सरावाची संधी आहे. सीजीईने 358 एक्सचेंज अभ्यागतांना प्रायोजित केले आहे.

श्री. शिवाजी शिक्षण संस्थेने सीजीईशी सामंजस्य करार केल्यामुळे या संस्थेद्वारे संचालित अभ्यासक्रमांचा लाभ विद्यार्थी, प्राध्यापकांना मिळणार आहे. त्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रातील जागतिक बदल अंगीकारणे, 30 पेक्षा अधिक आंतरराष्ट्रीय उच्च समुपदेशकांशी जोडल्या गेल्याने विद्यापीठ प्रवेश आणि आंतरराष्ट्रीय उद्दिष्टांना प्रोत्साहन देणे आदी बाबी शक्य होतील. हा सामंजस्य करार करताना नागपूरच्या शिवाजी सांयस कॉलेजचे प्राचार्य डॉ. महेंद्र ढोरे, धनवटे नॅशनल कॉलेजचे प्राचार्य डॉ. जे. डी. वडते, पवनी येथील शिवाजी सायंस कॉलेजचे प्राचार्य डॉ. विजय लेपसे, शिवाजी शिक्षण संस्थेचे तज्ज्ञ विधिज्ञ अ‍ॅड. कुलदीप महल्ले आदी मान्यवर उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...