आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवराज्याभिषेकदिन:जिल्हा परिषदेत शिवराज्याभिषेकदिन सोहळा ; सार्वभौमत्व आणि स्वातंत्र्याची प्रेरणा देणारा मंगलमय दिवस

अमरावतीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शिवराज्याभिषेक दिन हा स्वराज्य, सार्वभौमत्व आणि स्वातंत्र्याची प्रेरणा देणारा मंगल दिवस आहे. हा खऱ्या अर्थाने रयतेचा उत्सव आहे, असे प्रतिपादन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी सोमवार ६ रोजी केले. शिवराज्याभिषेक दिनानिमित्त सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात जिल्हा परिषदेच्या प्रांगणात पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत झाला.जिल्हा परिषदेचे सीईओ अविश्यांत पंडा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. रांगोळ्या आणि फुलांच्या माळांनी सजलेले प्रांगण, छात्रसेनेच्या पथकाची वाद्यवृंदासह सलामी, भगवे फेटे घालून मान्यवरांचा सहभाग, बालशिवाजीच्या रूपात उपस्थित विद्यार्थी, तुतारीचे आसमंत निनादून टाकणारे सूर अशा मराठमोळ्या व मंगलमय वातावरणात सोहळ्याला सुरुवात झाली. ‘गर्जा महाराष्ट्र माझा…’ महा राष्ट्रगीताच्या सुरांनी वातावरण अधिक चैतन्यमय केले. पालकमंत्री अॅड. ठाकूर, तसेच पंडा व विविध मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण करून वंदन केले. पालकमंत्र्यांच्या हस्ते स्वराज्याची गुढीही यावेळी उभारण्यात आली. छत्रपती शिवराय हे लोककल्याणकारी राज्याची स्थापना करणारे लोकहितैषी सहिष्णू आदर्श राजा म्हणून जगभर वंदिले जातात. त्यांनी जनसामान्यांचे स्वराज्य स्थापन करत प्रजाहितदक्ष राज्यव्यवस्थेचे उदाहरण भावी राज्यकर्त्यांसमोर ठेवले. शिवराज्याभिषेक दिन हा स्वातंत्र्याची प्रेरणा देणारा पवित्र दिवस आहे, असे मनोगत पालकमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केले. कार्यक्रमाला विद्यार्थी, युवक, महिला, ज्येष्ठ नागरिक, विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...