आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मदतीचा हात:अमरावतीत प्रिस्क्रिप्शन दाखवा अन् मोफत घेऊन जा ऑक्सिजन सिलिंडर; अडचण असेल तर बजरंग दलाकडून घरपोच सेवा

अमरावती / अनुप गाडगे11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ‘श्रीवल्लभ’ ऑक्सिजन प्लँट देणार विनामूल्य ऑक्सिजन सिलिंडर

राज्यभरात एकीकडे ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. अनेक ठिकाणी तर मिळेल त्या दरात ऑक्सिजन घेण्यास रुग्णांचे नातेवाईक तयार होत आहेत. दुसरीकडे अमरावतीतील ‘श्रीवल्लभ ऑक्सिजन प्लँट’च्या संचालकांनी सामाजिक भान राखत मोफत आणि गरज भासलीच तर घरपोच ऑक्सिजन सिलिंडर देण्याची घोषणा केली आहे. रुग्णांची गैरसोय होऊ नये, वेळेवर त्यांना ऑक्सिजन मिळावे व त्यांचे प्राण वाचावे म्हणून हा निर्णय घेतला असल्याचे श्रीवल्लभ ऑक्सिजन प्लँटचे संचालक हिमांशू वेद यांनी स्पष्ट केले आहे.

‘श्रीवल्लभ’ यासाठी रुग्णांच्या नातेवाइकांकडून कोणतेही शुल्क आकारणार नाही. मात्र सिलिंडर घेऊन जातेवेळी सिलिंडरची अनामत रक्कम (डिपॉझिट) म्हणून साडेतीन हजार रुपये भरावे लागतील. ही रक्कमसुद्धा सिलिंडर परत केल्यानंतर परत केली जाणार आहे. ‘श्रीवल्लभ’ने घेतलेल्या या निर्णयाला बजरंग दलाने मदत करून प्लँटपासून सिलिंडर गरजवंताच्या घरापर्यंत विनामूल्य पोहोचवून देण्यासाठी तयारी दर्शवली आहे. अमरावतीत मागील अनेक वर्षांपासून रुग्णालयांना तसेच रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा करण्याचे काम श्रीवल्लभ ऑक्सिजन प्लँटकडून केले जात आहे. ‘श्रीवल्लभ’चा ऑक्सिजन प्लँट बडनेरा जुना बायपास मार्गावरील एमआयडीसीमध्ये आहे.

घरापर्यंत विनामूल्य सेवा देऊ
गरजूंनी आम्हाला किंवा आमच्या कोणत्याही कार्यकर्त्याला फोनद्वारे माहिती द्यावी, कोणतेही शुल्क न आकारता आम्ही घरपोच ऑक्सिजन सिलिंडर देणार आहोत. ही सुविधा मंगळवारपासून (दि. २७) सुरू करणार आहोत. - संतोषसिंह ऊर्फ बाबूभय्या गहरवार, संयोजक, बजरंग दल, अमरावती

दीड क्युबिक मीटरचे सिलिंडर
घरी उपचार घेणाऱ्या रुग्णांना आम्ही दीड क्युबिक मीटरचे सिलिंडर देणार आहोत. संबंधित रुग्णाला कितीही दिवस ऑक्सिजनची गरज असली तरी हा पुरवठा आम्ही विनामूल्य करणार आहोत. बजरंग दलाने सिलिंडर गरजूंना घरापर्यंत पोहोचवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. -हिमांशू वेद, संचालक

अमरावतीत घरपोच सिलिंडरसाठी इथे फोन करा
सिद्धेश सोळंके ९५४५७२४६०८
करण सोळंके ७७७६९७१४१०
शिवम भिंडा ९६३७९६३८००
संतोषसिंग गहरवार : ९७६६८८००९७/ ८८३०१५४५५२

बातम्या आणखी आहेत...