आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या मतदानाच्या वेळी गोंधळ:दोन्ही पॅनलचे कार्यकर्ते आमने-सामने, पोलिसांचा सौम्य लाठीचार्ज

अमरावती18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

विदर्भातील सर्वात मोठी शिक्षण संस्था असलेल्या श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी रविवारी सकाळपासून अमरावतीत मतदानाला सुरुवात झाली. मतदान सुरू असतानाच एका मतदान केंद्रात वरुड मोर्शी मतदारसंघाचे आमदार देवेंद्र भुयार आतमध्ये गेले.

त्यावरून विकास पॅनलच्या प्रतिनिधीने आक्षेप घेतला. यावेळी दोन्ही पॅनलचे कार्यकर्ते आमने-सामने येऊन चांगलाच गोंधळ झाला होता. यावेळी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी उपस्थित पोलिसांनी सौम्य बळाचा वापर केला. त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली आहे.

यामुळे वादाला सुरुवात

शहरातील श्री शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालयात मतदान प्रक्रिया सकाळी साडेसात वाजता सुरू झाली आहे. मतदान केंद्रावर एकूण पाच वर्ग खोल्यांमध्ये मतदान सुरू असून खोली क्रमांक पाचमध्ये मतदानासाठी येणारे बहुतांश मतदार हे ज्येष्ठ व वृद्ध असल्यामुळे त्यांच्यासोबत त्यांचा प्रतिनिधी मतदानाला येतो.

केंद्रावर झाली बाचाबाची

याच दरम्यान दुपारी बारा वाजताच्या सुमारास आमदार देवेंद्र भुयार हे त्या खोलीत पोहोचले. त्यावेळी विकास पॅनलच्या प्रतिनिधींनी आमदार देवेंद्र भुयार आतमध्ये कसे आले, हे मतदार नाहीत. असा आक्षेप घेतला. त्यावेळी प्रगती पॅनलचा एक उमेदवार आणि विकास पॅनलचा एक उमेदवार त्यांच्यात मतदान केंद्रावरच बाचाबाची झाली.

परिस्थिती शांत

हे कार्यकर्त्यांना माहित झाल्यानंतर दोन्ही पॅनलचे कार्यकर्ते एकमेकांसोबत बाचाबाची करायला लागले. प्रकरण चांगलेच वाढले. मतदान केंद्राच्या खोलीत सुरू असलेला वाद मैदानापर्यंत पोहोचला. त्यावेळी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी उपस्थित पोलिसांनी सौम्यबळाचा वापर केला. त्यानंतर पोलिसांनी काही जणांना तात्पुरते ताब्यातही घेतले आहे. आता परिस्थिती शांत आहे.

धक्काबुक्की झाली नाही

पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा मतदान केंद्राबाहेर वाढवण्यात आला आहे. मात्र या प्रकारामुळे शिवाजी शिक्षण संस्थेच्या निवडणुकीला गालबोट लागलेले आहे. शिक्षण क्षेत्रात अग्रेसर असलेल्या संस्थेच्या निवडणुकीत अशा प्रकारामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. दरम्यान मतदान केंद्राच्या खोलीत आमदार देवेंद्र भुयार यांना धक्काबुक्की झाल्याची चर्चा मतदान केंद्रावर सुरू आहे, मात्र मला कोणत्याही प्रकारची धक्काबुक्की झाली नाही, असे आमदार देवेंद्र भुयार यांनी सांगितले आहे.

बातम्या आणखी आहेत...