आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या विधानावरून राज्यात सर्वत्र टीका होत आहे. सोमवारी समस्त महाराष्ट्रनिष्ठ समाज बांधव अमरावतीच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक (इर्विन) ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मूक मोर्चा काढून निषेध करण्यात अाला.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राज्यातील कारकीर्द सुरुवातीपासूनच वादग्रस्त स्वरूपाची आहे. सुरुवातीला राज्यपाल कोश्यारी आणि महाविकास आघाडी यांच्यातील मतभेदाच्या बातम्या चांगल्याच गाजल्या. त्यानंतर आता राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर राज्यपालांनी सरकारबाबत विधान न करता मुंबई, ठाण्याबाबत विधान करत वाद ओढवून घेतला आहे. ‘कधी, कधी मी इथे लोकांना म्हणतो की, महाराष्ट्रात विशेष करून मुंबई, ठाण्यातून गुजराती आणि राजस्थानी लोकांना काढा, तर तुमच्याकडे पैसाच राहणार नाही. तुम्ही जे मुंबईला आर्थिक राजधानी म्हणताय ती राजधानी राहणारच नाही’, असे वादग्रस्त विधान राज्यपाल कोश्यारी यांनी केले होते.
त्या विधानावरून विविध स्तरातून टीका होत आहे. शहरात राज्यपालांच्या या विधाना विरोधात समस्त महाराष्ट्रातील समाजबांधव जिल्हा अमरावती आक्रमक झाले आहेत. या विधानाचा निषेध व्यक्त करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मूक मोर्चा काढण्यात आला. तसेच राज्यपाल कोश्यारी यांना तत्काळ पदावरून हटवण्यात यावे अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनातून केली.
या वेळी अश्विन चौधरी, नितीन देशमुख, अनिल टाले, प्रकाश राऊत, नीलेश ठाकरे, सुनील खांडे, डॉ. किशोर बेले, कैलाश गिरोळकर, सुशील पडोळे, प्रवीण देशमुख, मनोज डफळे, सुनील सुपटकर, अॅड. अजय ढोरे, गजानन रडके, प्रवीण मनोहरे, अतुल गायगोले, संजय ठाकरे, सतीश काळे, उमेश लाठेकर, मनोज सोळंके, प्रवीण लोखंडे, मनाली तायडे, ज्योती उगले, प्रतिभा रोडे यांच्यासह आदी उपस्थित होते.,
९ ऑगस्ट क्रांतीदिनी राज्यभर आंदोलनाचा इशारा
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेले वक्तव्य हे राज्यविरोधी आहे. त्यांनी मराठी माणसाचा अवमान केला आहे. महाराष्ट्राची संस्कृती संपूर्ण जगात ओळखली जाते. त्यामुळे कोश्यारी यांचे विधान निषेधार्थ असून, त्यांना ८ ऑगस्टपर्यंत राज्यपाल पदावरून हटवण्यात यावे, अन्यथा ९ ऑगस्ट क्रांती दिनी राज्यभर तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा, समस्त महाराष्ट्रनिष्ठ समाज बांधवांनी दिला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.