आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेशीम कोष विक्रीसाठी:बडनेऱ्यात प्रथमच रेशीम बाजार सुरू; सव्वाआठ क्विंटल कोष विक्रीला

अमरावती2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

रेशीम शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना आपल्या परिसरातच हक्काची बाजारपेठ उपलब्ध व्हावी, तसेच अधिकाधिक शेतकऱ्यांनी रेशीम शेतीकडे वळावे, या उद्देशाने जिल्ह्यात पहिला रेशीम कोष बाजार कृषी उत्पन्न बाजार समितीने सोमवारी (दि. ५) बडनेराच्या बाजारात सुरू केला आहे. विशेष म्हणजे पहिल्याच दिवशी या बाजारात सव्वाआठ क्विंटल रेशीम कोष विक्रीसाठी शेतकऱ्यांनी आणले होते.

अमरावती व भातकुली तालुक्यात तूर्तास १५० हून अधिक शेतकरी रेशीम शेती करतात. या दोन तालुकांव्यतिरीक्तही रेशीम शेती करणारे शेतकरी जिल्ह्यात आहेत. मात्र या शेतकऱ्यांना हक्काची बाजारपेठ नसल्यामुळे कोष निर्मिती झाल्यानंतर विक्रीसाठी चांगलाच त्रास व्हायचा. त्यामुळेच कृषी उत्पन्न बाजार समिती व रेशीम प्रादेशिक कार्यालयाने स्थानिक बाजारपेठेत कोषची विक्री व्हावी, अशी व्यवस्था केली आहे.

त्यामुळेच जिल्ह्यातीलच नव्हे विदर्भातील पहिला कोष खरेदी बाजार बडनेरात सुरू करण्यात आला आहे. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून पौर्णिमा सवाई, रेशीम प्रादेशिक कार्यालयाचे उपसंचालक महेंद्र ढवळे, सहायक संचालक अरविंद मोरे, अमरावती बाजार समितीचे सचिव दीपक डोईफोडे, कोष बाजारचे प्रमुख राजेंद्र वानखडे व अन्य मान्यवर उपस्थित होते. दरम्यान आज पहिल्याच दिवशी बाजारात कोषाला प्रतिक्विंटल ६०० ते ६६० रुपये प्रतिकिलो भाव देण्यात आला एकूण ४ लाख ९९ हजार हजार रुपयांची उलाढाल कोष बाजारात झाली असल्याचे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले आहे.

पश्चिम बंगालमधून येणार खरेदीदार
पहिल्या दिवशी कोष बाजारात स्थानिक खरेदीदारासह भंडारा येथील खरेदीदार आले होते. तसेच सुरुवात असल्यामुळे सद्या कोष बाजार आठवड्यातील सोमवार व गुरुवार हे दोनच दिवस सुरू राहणार आहे. तसेच आगामी काळात बडनेरा कोष बाजारात पश्चिम बंगालमधील खरेदीदार येणार आहे. तशी चर्चा बाजार समितीमधील अधिकाऱ्यांनी संबंधित व्यापाऱ्यांसोबत केली आहे.

दळणवळण सुविधेसाठी बडनेरात बाजार सुरू केला
देशातील मोठा कोष बाजार हा कोलकाता, हैदराबाद शहरात भरतो. आगामी काळात बडनेरा बाजारात मोठ्या शहरातील व्यापाऱ्यांनी यावे म्हणून आपण अमरावतीऐवजी बडनेरा बाजारात कोष बाजार सुरू केला आहे. जेणेकरून व्यापाऱ्यांना दळणवळणाच्या दृष्टीने सोईचे व्हावे. बडनेरात सुरू झालेला कोष बाजार हा जिल्हा, विदर्भातील पहिलाच आहे.-दीपक विजयकर, सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती, अमरावती.

बातम्या आणखी आहेत...