आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा८ मार्च १९९२ चा दिवस. सुधाकरराव नाईक महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आणि ते चिखलदरा येथे एका अंध विद्यालयाच्या उद््घाटनासाठी आले होते. त्या वेळी उद्घाटन कार्यक्रमात तत्कालीन मुख्यमंत्री नाईक यांचे भाषण सुरूच असताना माई त्या ठिकाणी पोहोचल्या. त्या वेळी माईंनी थेट सुधाकरराव नाईक यांच्या हातातून माइक घेतला आणि त्यांना सांगितले की, मी या ठिकाणी तुम्हाला पाहायला नाही आले, साहेब, माझ्या आदिवासी, गवळी बांधवांना प्रचंड समस्यांचा सामना करावा लागत आहे, पिण्यासाठी पाणी नाही, दवाखाने नाहीत. त्या वेळी सुधाकरराव नाईक यांनी माईंचे सर्व म्हणणे ऐकून तातडीने समस्या मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचा शब्द दिला होता. ही आठवण सांगताना शहापूरचे उपसरपंच बाबू हेकडे यांनासुद्धा भरून आले होते.
१९७९-८० च्या काळात सिंधुताई सपकाळ (माई) मेळघाटातील शहापूर या गावात आल्या होत्या. आल्यानंतर त्यांनी पाहिले की, आदिवासी बांधव, गवळी बांधव यांना अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्या वेळी १९८९ च्या काळात माईंनी सलग शंभर दिवस साखळी उपोषण केलेे होते आणि त्या उपोषणाची फलश्रुती म्हणून आदिवासी व गवळी बांधवांना त्यांची गुरे चारण्यासाठी परवानगी वन विभागाने दिली होती. अशा प्रकारे अनेकदा माईंनी आमच्यासाठी संघर्ष केल्याचे शहापूरचे उपसरपंच बाबू हेकडे यांनी सांगितले.
बाबू, मला पद्मश्री मिळाला !
२५ जाने. २०२१ ला माईंना पद्मश्री पुरस्कार मिळाल्याची घोषणा झाली होती. पुरस्कार जाहीर होताच पहिला फोन माईंनी मला केला. कारण ज्या शहापूरपासून माझा लढा सुरू झाला होता, ज्या परिसरातील लोकांनी मला साथ दिली, त्यांना ही बाब मला सर्वप्रथम सांगायची होती,असे बाबू हेकडे यांनी सांगितले.
अडीच महिन्यांपूर्वी शेवटची भेट
शहापूरपासून जवळच एक गोपाळकृष्ण मंदिर आहे. हे मंदिर प्रशस्त असावे, त्या ठिकाणी दरदिवशी अन्नदान व्हावे, अशी माईंची इच्छा होती. त्यामुळे मागील काही महिन्यांपासून या मंदिराचे बांधकाम सुरू झाले आहे. दरम्यान, ते बांधकाम पाहण्यासाठीच माई ऑक्टोबर महिन्यात शहापूरला आल्या होत्या. त्या दिवशी मंदिरावर स्लॅब टाकण्यात येणार होता. माईंनी आपल्या हाताने दोन टोपले काँक्रीट स्लॅबवर टाकले आणि स्लॅब पूर्ण होईस्तोवर दिवसभर माई त्याच ठिकाणी थांबल्या. त्या वेळी गावकऱ्यांंसोबत त्यांनी चर्चासुद्धा केली. ही माईंची शहापूरला शेवटची भेट ठरली असल्याचे उपसरपंच बाबू हेकडे यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.