आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निर्णय शंभर टक्केंचा, पण मदत मात्र 80%:मग शेतकऱ्याची चूक कोणती ? चांदुर बाजार तालुक्यातील प्रशासनाकडून दिशाभूल

अमरावतीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
माध्यमांसमोर भूमिका मांडताना लोकविकास संघटनेचे पदाधिकारी - Divya Marathi
माध्यमांसमोर भूमिका मांडताना लोकविकास संघटनेचे पदाधिकारी

शासन निर्णयामध्ये 100 टक्के निधी वाटपाची तरतूद असतानाही तालुक्यातील तळेगाव मोहना व आसेगाव पूर्णा महसूल मंडळातील बाधीत शेतकऱ्यांना महसूल आणि कृषी विभागाकडून फक्त 80 टक्के मदतीच्या अधीन राहून निधी वाटप करण्यात आले. त्यामुळे लोकविकास संघटनेचे पदाधिकारी यांनी आज, मंगळवार,1 नोव्हेंबरला पत्रकार परिषद घेऊन या प्रशासकीय कृतीचा निषेध केला. त्याचवेळी मागणीनुरुप निर्णय न घेतल्यास भविष्यात तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा दिला.

चांदुर बाजार तालुक्यातील सात महसूल मंडळांपैकी 5 महसूल मंडळांमध्ये जिल्हा प्रशासनातर्फे अतिवृष्टी घोषित झाली होती. उर्वरित तळेगाव मोहना आणि आसेगाव पूर्णा या दोन मंडळामध्ये अतिवृष्टीची नोंद नसल्याने ती दोन मंडळे नुकसान भरपाईच्यादृष्टीने मागे पडली होती. परंतु नंतर पर्जन्यमापक यंत्रच सदोष असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे त्या मंडळातील शेतकऱ्यांनाही इतरांप्रमाणेच मदत दिली जाईल, असे जिल्हा प्रशासनाचे म्हणणे होते. मात्र प्रत्यक्षात त्या शेतकऱ्यांना अद्यापही पूर्ण लाभ मिळाला नाही.

अतिवृष्टीमुळे अमरावती जिल्ह्यात उद्भवलेल्या पूरपरिस्थितीमुळे या मंडळातील शेतकऱ्यांचेही मोठे नुकसान झाले. त्यामुळेच त्यांनाही इतर महसूल मंडळातील बाधित शेतकऱ्यांप्रमाणेच वाढीव दराने मदत देण्याबाबत 8 सप्टेंबरला शासन निर्णय निर्गमित करण्यात आला. परंतु प्रत्यक्षात त्या निर्णयाची अद्यापही अंललबजावणी करण्यात आली नाही.

दरम्यान येत्या 8 दिवसात त्या दोन महसूल मंडळांमध्येही अतिवृष्टी झाल्याची घोषणा करुन संबंधित शेतकऱ्यांना उर्वरित 20 टक्के अनुदान दिले जावे, अशी मागणी लोकविकास संघटनेने केली आहे. दरम्यान हा निर्णय न घेतल्यास प्रशासनाविरुद्ध तीव्र आंदोलन छेडले जाणार असल्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. 8 सप्टेंबर 2022 च्या शासन निर्णयानुसार सरकारने जाहिर केलेले अनुदान हे कोरडवाहूकरिता हेक्टरी 13 हजार 600, बागायती शेतकऱ्यांना 27 हजार रुपये आणि फळबाग उत्पादकांना हेक्टरी 36 हजार रुपयांच्या मदतीची तरतूद आहे. परंतु प्रत्यक्षात या मंडळांतील शेतकऱ्यांना 20 टक्के कमी रक्कम देण्यात आली.

लोकविकास संघटनेच्या मते याबाबत अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यसभा सदस्य तथा माजी कृषी मंत्री डॉ अनिल बोंडे, खासदार नवनीत राणा, अचलपूरचे आमदार बच्चू कडू, तहसीलदार, ठाणेदार यांनाही निवेदन देण्यात आले आहे. पत्रकार परिषदेला लोकविकास संघटनेचे अध्यक्ष गोपाल भालेराव, मुख्य संघटक रमण लंगोटे आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...