आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराविजेशिवायही दिवे प्रकाशमान होऊ शकतात, हे सौर ऊर्जेमुळे शक्य झाले आहे. त्यामुळेच कळ दाबली अन्.. तिकडे दिवा प्रकाशमान झाला, असे दृश्य विद्यापीठाच्या एका कार्यक्रमात बघायला मिळाले. परंपरागत विजेशिवाय सौर ऊर्जा अभावानेच माहीत असणाऱ्या विद्यार्थी व उपस्थितांना त्यामुळे काहीसे आश्चर्य वाटले. परंतु वस्तुस्थिती माहीत झाल्यानंतर सर्वांनी परंपरागत विजेला सौर ऊर्जेचा पर्याय दिला पाहिजे, असे मत व्यक्त केले.
महाऊर्जा विभागाकडून संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात अलिकडेच ऊर्जा संवर्धन तंत्रज्ञान पथदर्शी प्रकल्प पूर्णत्वास गेला आहे. महा ऊर्जा विभागामार्फत राबवण्यात आलेल्या या प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात ऊर्जेची बचत होत असून, त्यामुळे विजेच्या खर्चातही मोठी बचत झाली आहे. दरम्यान हा विचार विद्यापीठाशी संबंधित सर्व महाविद्यालये व इतर संस्थांमध्येही रुजवण्यात यावा, यासाठी विद्यापीठात “आजादी का अमृत महोत्सव” अंतर्गत “उज्ज्वल भारत, उज्ज्वल भविष्य” सप्ताह आयोजिण्यात आला आहे. त्यासाठी विद्यापीठात सौर उर्जेचे माहिती देणारा स्टॉल लावण्यात आला असून त्या स्टॉलचे उद्घाटन करताना विद्यार्थ्यांना वरील अविष्कार बघायला मिळाला.
कुलगुरु डॉ. दिलीप मालखेडे यांनी दीप प्रज्वलित करुन स्टॉलचे उद्घाटन केले. त्यानंतर अपारंपरिक ऊर्जेवर चालणारा दिवा प्रकाशमान करुन उज्ज्वल भारत - उज्वल भविष्य या सप्ताहाचा अनोख्या पद्धतीने शुभारंभ करण्यात आला. यावेळी कुलसचिव डॉ. तुषार देशमुख, महा ऊर्जा विभागाचे विभागीय महाव्यवस्थापक प्रफुल्ल तायडे, प्रकल्प अधिकारी हर्षल काकडे व स्नेहल आसोले यांच्यासह इतर कर्मचारी, विद्यापीठाचे सर्व विभागप्रमुख तसेच शिक्षक वृंद व विद्यार्थी उपस्थित होते.
कुलगुरू डॉ. दिलीप मालखेडे यांनी आपल्या भाषणात सौर ऊर्जेचे महत्व पटवून देतानाच या पद्धतीचा अवलंब करणे, ही काळाची गरज असल्याचे सांगितले. ही प्रणाली पर्यावरणपूरक असून, गेल्या अनेक दिवसांपासून विद्यापीठ या ऊर्जेचा उपयोग करीत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. त्याचवेळी विद्यापीठाचा हा कित्ता संबंधित सर्व महाविद्यालये व संस्थांनी गिरवावा, यासाठी संबंधितांना सूचना देण्यात येईल, असेही सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विभागीय महाव्यवस्थापक प्रफुल्ल तायडे यांनी केले. प्रास्ताविकादरम्यान महाऊर्जाच्या विविध योजनांची त्यांनी माहिती दिली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.