आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजीवन कारावास:वडिलांचा खून करणाऱ्या मुलाला आजीवन कारावास; दीड वर्षांपूर्वी पोहराबंदी गावात घडली होती घटना

अमरावती2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुलाने केलेल्या मारहाणीत वडिलांचा मृत्यू झाला. या प्रकरणी मुलाला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश रवींद्र जोशी यांच्या न्यायालयाने सोमवारी आजीवन सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. ही घटना २२ जुलै २०२० रोजी फ्रेजरपुरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत पोहराबंदी गावात घडली होती.

राजू मारोतराव पाचबुध्दे (४२) रा. पोहराबंदी असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. २२ जुलै २०२० रोजी सायंकाळी पोहराबंदी येथील पार्वती मारोतराव पाचबुध्दे (६५) व त्यांचे पती मारोतराव चंपकराव पाचबुध्दे हे घराच्या आवारात बसले होते. यावेळी त्यांचा मुलगा राजू मद्यधुंद अवस्थेत घरी आला. त्याने आई-वडिलांना शिवीगाळ केली. वर्षभरापासून अमरावतीत राहत असलेली पत्नी व मुले यांना आणून द्या; नाही तर तुमचा जीव घेतो, असे म्हणून राजूने वडील मारोतराव यांच्यावर लोखंडी वस्तूने हल्ला चढवला. यात मारोतराव गंभीर जखमी झाले. हा प्रकार लक्षात आल्यावर शेजाऱ्यांनी मारोतराव यांची राजूच्या तावडीतून सुटका केली. राजू तेथून पळून गेला. त्यानंतर मारोतराव यांना उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी पार्वती यांच्या तक्रारीवरून राजूविरुध्द सुरूवातीला प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

दरम्यान उपचार सुरू असतानाच मारोतराव यांचा २३ जुलै २०२० रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे पोलिसांनी या गुन्ह्यात खुनाचे कलम वाढवले. पोलिस निरीक्षक नितीन मगर यांनी या गुन्ह्याचा तपास पूर्ण करून न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. सदर प्रकरणात प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश रवींद्र एम. जोशी यांच्या न्यायालयात ९ साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली. साक्षीदारांची साक्ष आणि सरकारी पक्षाचा युक्तीवाद ग्राह्य धरून न्या. रवींद्र जोशी यांनी राजू पाचबुद्धेला आजीवन सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त शासकीय अभियोक्ता पंकज रामेश्वर इंगळे यांनी युक्तिवाद केला. पैरवी अधिकारी म्हणून देवराव डकरे व अरुण हटवार यांनी कामकाज पाहिले.

बातम्या आणखी आहेत...