आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कपाशीचा पेरा:खरिपातील पेरणी क्षेत्रापैकी 90 टक्के  होणार सोयाबीन, तूर व कपाशीचा पेरा ; कृषी विभागाचा अंदाज

अमरावतीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

दरवर्षीच्या तुलनेत यंदा मान्सूनचे आगमन लवकर होणार असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तवला आहे. त्यामुळे खरिपाच्या पेरणीसाठी शेतकऱ्यांची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. दरम्यान, मागील वर्षीच्या तुलनेत यंदा जिल्ह्यात कपाशीच्या पेरणी क्षेत्रात वाढ होणार असल्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तवला आहे. जिल्ह्यात सर्वाधिक ३२ हजार ८०० हेक्टरवर दर्यापूर तालुक्यात कपाशीची तर सोयाबीनची सुमारे ४८ हजार १०० हेक्टरवर सर्वाधिक पेरणी नांदगाव खंडेश्वर तालुक्यात होणार आहे. जिल्ह्याचा विचार करता खरीप हंगामातील प्रमुख पीक म्हणून कपाशी व सोयाबीनकडे पाहिले जाते. जिल्ह्यात सुमारे ६ लाख ८७ हजार ८९७ हेक्टरमध्ये खरीप हंगामात पेरणी केली जाते. यामध्ये कापूस, सोयाबीन, तूर, मूग, ज्वारी, उडीद तसेच मेळ घाटात भात आदी पीक घेतली जातात. विशेष म्हणजे खरीप हंगामातील एकूण पेरणी क्षेत्राच्या तब्बल ९० टक्के क्षेत्रात सोयाबीन, तूर व कपाशीची पेरणी केली जाणार आहे. यामध्ये सर्वाधिक ३८ टक्के क्षेत्रात सोयाबीन, ३४ टक्के क्षेत्रात कपाशी व १८ टक्के क्षेत्रात तुरीचा पेरा होणार आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा जिल्ह्यात कपाशीसोबतच सोयाबीनच्या पेरणी क्षेत्रातही वाढ होणार आहे. त्यामुळे यंदा मूग, उडीद व इतर पिकांचे पेरणी क्षेत्र कमी होणार आहे. कारण मूग व उडीद हे पेरणीनंतर ५० ते ६० दिवसात येणारे पीकं आहे. वास्तविकता कमी दिवसांचे पीक असल्यामुळे शेतकऱ्यांना रब्बीचे दुसरे पीक घेण्यासाठी फायद्याचे ठरते, मात्र मागील काही वर्षांपासून मूग व उडदाच्या काढणी दरम्यान येत असलेला पाऊस मूग व उडीदाचे प्रचंड नुकसान करत आहे. त्यामुळे जिल्ह्यात मूग व उडीदाचा पेरा घटणार असल्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तवला आहे. दरम्यान, यंदा पाऊस लवकर येण्याचे संकेत असल्याने खरिपासाठी तयारीलाही जिल्ह्यात वेग आला आहे.

बातम्या आणखी आहेत...