आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्यातील गुंजी गावाजवळ धामणगाव-तिवसा मार्गावर असलेल्या वळणावर दुचाकी अनियंत्रित होऊन झालेल्या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (दि. २९) सकाळी उघडकीस आली. रणजित रामचंद्र राणा (२०) व सोनू सुभाष मोदी (२२) अशी मृतांची नावे असून दोघेही फर्निचरचे कारागिर असून आर्वी, जि. वर्धा येथे मुक्कामाला होते. ते मुळचे भुचाई (झारखंड) येथील असल्याचे कुऱ्हा पोलिसांनी सांगितले.
वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथील एका फर्निचरच्या कंत्राटदाराकडे सुतारकाम करण्यासाठी दोघेही कामावर होते. त्यामुळे ते आर्वी येथे मुक्कामाला होते. गुरुवारी (दि. २८) रात्री बारा वाजताच्या दरम्यान धामणगाव शहरातील एका ठिकाणी दिवसभर फर्निचरचे काम उरकून दोघेही दुचाकीने (एमएच ३२ /एम ९९५) आर्वीकडे जाण्यासाठी निघाले होते. दरम्यान, गुंजी गावाच्या अर्धा किमी. आधी असलेल्या वळणार दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने दोघेही भरधाव दुचाकीसह रस्त्याच्या कडेला असलेल्या पाण्यात पडले. त्यात दोघांनाही गंभीर दुखापत झाल्याने व दुचाकीत अडकल्याने त्यांना बाहेरही पडता आले नाही. गंभीर जखमी अवस्थेत पाण्यात बुडल्याने गुदमरून त्यांचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
शुक्रवारी सकाळी शेतावर जात असलेल्या मजुरांना दोघेही मृतावस्थेत पडून असल्याचे दिसल्याने कुऱ्हा पोलिसांना माहिती देण्यात आली. माहिती मिळताच ठाणेदार संदीप बिरांजे व पोलिस पथकाने घटनास्थळ गाठले. दोघांचेही मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवले. शवविच्छेदनानंतर आर्वी येथील मृताच्या संबंधितांना दोघांचेही मृतदेह सोपवण्यात आले. दरम्यान, कुऱ्हा पोलिसांनी बेजबाबदारपणे वाहन चालवून रस्ते अपघाताच्या कलमान्वये घटनेची नोंद केली आहे. पुढील तपास कुऱ्ह्याचे ठाणेदार संदीप बिरंजे, पोउनी गणेश सपकाळ यांच्यासह सतीश ठवकर, अनिल निंगोट करत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.