आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोककला:लोपामुद्रा महोत्सवात कालबेलिया, घुमर, भवई, केसरिया, चरी, चक्री नृत्याची धूम

अमरावती2 महिन्यांपूर्वीलेखक: संजय आवटे
  • कॉपी लिंक

लोपामुद्रा राष्ट्रीय पारंपरिक नृत्य व हस्त शिल्पकला महोत्सवात लोकनृत्यासाठी प्रसिद्ध असलेल्या राजस्थानातील लोकनृत्य कालबेलिया, घुमर, भवई, केसरिया बालम, चक्री, चरी या लोकनृत्याने धूम करीत कलारसिकांना सुमारे अडीच तास मंत्रमुग्ध केले. संस्कृती मंत्रालय, भारत सरकार, सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र शासन, पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, उदयपूर राजस्थान व कॅनव्हा फाउंडेशन द शेड ऑफ आर्ट चॅरिटेबल ट्रस्ट अमरावतीचे अध्यक्ष आशिष शेरेकर यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या सायंस्कोर मैदानावर लोपामुद्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

कला रसिकांना नृत्याच्या मध्येच खळखळून हसायला लावणारे विनोदही सादर केले जात होते. राजस्थानचे प्रसिद्ध लोककलावंत शिव नारायण यांच्या समूहात ममताबाई, सोरत व किस्मत सिंग, श्रीदेवी, पायल, जनताबाई , मधू, सूईयानी, विनीत, वासुदेव, सुखदेव, माकन लाल, ओमा यांनी विविध लोकनृत्य, लोकगीत सादर केले. हार्मोनियमवर वादन व गायन नानक राऊत यांनी केले. ढोलकीवर प्रतिक शर्माने त्यांना साथ दिली. कालबेलिया नृत्यात काळे पोषाख परिधान करून नर्तकींनी राग व्यक्त केला. तर घुमर या नृत्यात विविधरंगी पोशाख घालून गोल फिरत नृत्य सादर केले. भवई नृत्य करणाऱ्या ममताबाई यांनी डोक्यावर सहा पाण्याचे हंडे ठेऊन त्याचा तोल सावरत तांडाने नोट उचलणे, काचेवर नृत्य करणे, प्याल्यावर वाट्या ठेऊन त्यावर नृत्य करणे असे चित्तथरारक कर्तब दाखवले. तसेच कलावंतांनी सिंहाप्रमाणे युद्ध करणाऱ्या योद्ध्यावर केसरिया बालम हे लोकप्रिय लोकगीत सादर केले.

चक्री, चरी वेगवान नृत्य
जणू नर्तकींच्या पायाला चक्रीच आहे, असे गोलगोल फिरत तसेच अजिबात न थांबता वेगाने चक्री व चरी वेगवान नृत्य सादर केले. हे नृत्यही कलारसिकांना चांगलेच आवडले. त्यांनी टाळ्यांनी दाद देत लोककलावंतांचा उत्साह वाढविला. रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

बातम्या आणखी आहेत...