आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदोलन:एसटीचे कंत्राटी चालक, कामगार धडकले कलेक्टर कचेरीवर ; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

अमरावती22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गणेशोत्सवानिमित्त राज्यात उत्साहाचे वातावरण असताना जिल्ह्यातील एसटी महामंडळातील २०० च्या वरती कंत्राटी चालकांवर बेरोजगार होण्याची वेळ आली आहे. कंत्राटी चालकांची सेवा बंद करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. या विरोधात मंगळवारी कंत्राटी चालक जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले. यावेळी सेवेत पूर्ववत कामावर रुजू करावे, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनातून केली आहे. एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांनी २७ ऑक्टोबर २०२१ पासून संपाची हाक दिली होती. संप काळात प्रवासी वाहतूक सुरळीत राहणे आणि कर्मचाऱ्यांचा संप चिरडून टाकण्यासाठी महामंडळाने जिल्ह्यात टप्प्याटप्प्याने एकूण २०० च्या चालकांची कंत्राटी पद्धतीने नियुक्ती केली. उच्च न्यायालयाने २२ एप्रिलपासून कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्याचे आदेश दिल्यानंतर कर्मचारी कामावर रुजू झाले. संपकाळात वाहतूक सुरू ठेवण्यासाठी बाह्य संस्थेतर्फे चालक कम वाहक यांची नियुक्ती केली होती. या नियुक्तीला सातत्याने मुदतवाढ दिली होती. सध्या महामंडळात कंत्राटी चालकांचा नगण्य वापर होत असल्याने ३ सप्टेंबरपासून कंत्राटी चालकांचा वापर बंद करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे, त्यानंतर जिल्ह्यातील आठ आगारातून कंत्राटी चालकांना काढण्यात आले. त्यामुळे आता या सर्वांवर उपासमारीची वेळ आली आहे.

मंगळवारी या विरोधात चालक जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले. यावेळी कोणतीही पूर्वसूचना न देता कामावरून कमी करण्यात आल्याचा आरोप यावेळी बसचालकांनी केला. तसेच महामंडळाने कंत्राटी चालकांना पूर्ववत रुजू करावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.यावेळी विजय भोयर, मनीष कपिले, श्रीकांत सोनोने, नीलेश आळे, सागर वानखडे, गजानन चऱ्हाटे, आसिफ खान, पंकज कपिले, भूषण साळवे, एस.एम. रहमान, अक्षय गोपाळ, प्रवीण फुटाणे, रुपेश वानखडे, अंकुश मलवार, सुमित मारोटे, विकी आंबेकर, आशिष गुडधे, फिरोज खान, सूरज भडके, विनोद तिवारी, संतोष देशमुख, प्रफुल्ल दांडगे, ताराचंद डहाके आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...