आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासंत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील रिसर्च व इन्क्युबेशन फाउंडेशन केंद्र, आयआयएल विभाग तसेच संगणकशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने वार्षिक राष्ट्रीय प्रोजेक्ट स्पर्धा व स्टार्ट-अप आणि व्यावसायिक योजना २०२२ चे आयोजन भौतिकशास्त्र विभागात करण्यात आले. कुलगुरू डॉ. दिलीप मालखेडे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यासोबतच विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय दर्जाचे समाजोपयोगी अविष्कार बघितले.
स्टार्ट-अप फेस्ट च्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकता व नवोपक्रम विकास व्हावा, त्यांच्यात कौशल्य विकसित व्हावे, भावी उद्योजक म्हणून त्यांनी पुढे यावे, त्यांना भविष्यात उद्योग उभारता यावा, यासाठी स्टार्ट-अप मैलाचा दगड ठरेल असे प्रतिपादन कुलगुरू डॉ. दिलीप मालखेडे यांनी यावेळी केले.
उद्घाटन प्रसंगी विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. संजय डुडुल, आयआयएलच्या संचालक डॉ. स्वाती शेरेकर, संगणकशास्त्र विभाग प्रमुख डॉ. विलास ठाकरे, विभागातील प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते. स्टार्ट-अप फेस्ट मध्ये संगणकशास्त्र व माहिती तंत्रज्ञान, परमाणू व विद्युत अभियांत्रिकी, स्थापत्य व यांत्रिकी, रासायनिक जैवतंत्रज्ञान, शेतीविषयक तसेच इतर विज्ञान आणि अभियांत्रिकी विषयांतील एकूण १५२ विद्यार्थी संघांनी सहभाग नोंदविला. या सहभागी संघांमध्ये संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठामधील शैक्षणिक विभाग आणि विविध संलग्नित विज्ञान आणि अभियांत्रिकी व इतर सर्व महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांचा तसेच राष्ट्रीय स्तरावर विविध राज्यातील स्पर्धकांचा समावेश आहे. द्वितीय स्तरावरील स्टार्ट-अप स्पर्धेत एकूण २८ नोंदणीकृत कंपन्यांच्या प्रतिनिधींनी सहभाग घेतला. या सर्व स्पर्धकांनी अत्यंत नाविन्यपूर्ण पद्धती व तंत्रज्ञान यांचा उपयोग करून विविध समाजोपयोगी आविष्कारांचे सादरीकरण केले.
काही निवडक प्रकल्पामध्ये आपतकालीन परिस्थिती बहुपयोगी मदत वाहन, कीटकनाशके बनवणारे उपकरण, वाहन चालवताना चालकाला झोप आल्यास संभाव्य अपघात टाळण्यासाठीची यंत्रणा, वाहनाच्या शॉकअपच्या माध्यमातून विद्युत निर्मिती, रेल्वे अपघात टाळण्यासाठी यंत्रणा या विषयांवर संशोधन प्रदर्शित केले. स्पर्धेचा उद्या समारोप असून या प्रसंगी. सहायक संचालक ऑफ इंडस्ट्रीज सुरेश लोंढे हे अतिथी म्हणून उपस्थित राहतील.
समारोप समारंभात भरघोस बक्षिसांचा होणार वर्षाव
ही स्पर्धा ५ व ६ मे असे दोन दिवस आयोजित केली असून या सर्व प्रकल्पांचे मूल्यांकन विविध प्रख्यात शैक्षणिक संस्थांमधील २० तज्ञ परीक्षकांकडून करण्यात आले. या स्पर्धांतील विजयी स्पर्धकांना प्रत्येक संवर्ग आणि गटांमधून १५ हजार, १० हजार आणि ५ हजार असे अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय पारितोषिक आणि स्टार्ट-अप मधील विजेत्यास प्रत्येकी १० हजार ; तसेच एकूण ३ लाखाची वर्क ऑर्डर अशी भरघोस बक्षिसे मिळणार आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.