आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाट्य स्पर्धा:अमरावतीत उद्यापासून 16 डिसेंबरपर्यंत राज्य नाट्य स्पर्धा

अमरावती2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्य मराठी नाट्य स्पर्धेंतर्गत यावर्षी अमरावतीकर रसिकांना अनिल बर्वे यांची ऐतिहासिक कलाकृती हमीदाबाईची कोठी व थँक्यू मिस्टर ग्लाड आणि अजित दळवी लिखित ‘गांधी विरुद्ध गांधी’ यासारखी दर्जेदार आणि एकाहून एक सरस नाटके पहायला मिळणार आहेत. सोमवार, दि. ५ डिसेंबरपासून ही स्पर्धा सुरु होत आहे. विदर्भ महाविद्यालयाच्या परिसरातील संगीतसूर्य केशवराव भोसले सभागृहात दररोज सायंकाळी ७ वाजता एक नाटक याप्रमाणे १६ डिसेंबरपर्यंत नाटकांची ही श्रृंखला चालणार आहे.

उद्घाटनाच्या पहिल्या दिवशी रजनीश जोशी लिखित ‘भूल भिंगरी’चा प्रयोग सादर केला जाईल. या नाटकाचे सादरीकरण वैष्णवी महिला व आदिवासी विकास बहुउद्देशीय संस्थेतर्फे केले जाणार असून, दिग्दर्शन रिंकू सरोदे यांनी केले आहे. ६ डिसेंबरला ‘जनावर व्हाया माणूस’ चा प्रयोग होणार असून, तुषार काकड लिखित व दिग्दर्शित या नाटकाचे सादरीकरण नटराज शैक्षणिक सांस्कृतिक व क्रीडा संस्थेद्वारे केले जाईल. त्यानंतर ७ डिसेंबरला किशोक पाचकवडे यांचे बी पॉझिटिव्ह, ८ डिसेंबरला राजन बिवलकर यांचे खेळ नियतीचा, ९ ला काही सावल्यांचे खेळ ही नाटके सादर केली जातील. काही सावल्यांचे खेळ हे नाटक प्रसन्न शेंबेकर यांनी लिहिले असून, सागर रघुवंशी यांनी दिग्दर्शन केले आहे.

शनिवार, १० डिसेंबरला कु.सौ. कांबळे ही गाजलेली कलाकृती सादर केली जाईल. महेंद्र सुके लिखित या नाटकाचे दिग्दर्शन दीपक नांदगावकर यांनी केले असून, येथील गंधर्व बहुउद्देशीय संस्थेतर्फे त्या नाटकाचे सादरीकरण केले जाणार आहे. १२ डिसेंबरला प्रा. सलीम शेख लिखीत व हर्षद ससाणे दिग्दर्शित थलाई कुत्तल हे नाटक सादर होणार आहे. अथ इति नाट्यकला प्रतिष्ठाण या संस्थेतर्फे हे नाटक सादर केले जाणार आहे. १३ ला हमीदाबाईची कोठी या नाटकाचे सादरीकरण इंदूरच्या अष्टरंग संस्थेद्वारे केले जाणार असून या नाटकाचे दिग्दर्शन अनिल चाफेकर यांनी केले आहे.

…म्हणून मध्य प्रदेशचीही नाटके हमीदाबाईची कोठी हे नाटक मध्य प्रदेशातील अष्टरंग संस्थेतर्फे तर ‘खेळ नियतीचा’ या नाटकाचे सादरीकरण करणारी महाराष्ट्र समाज, देवास ही संस्थादेखील मध्य प्रदेशची आहे. मध्य प्रदेशातील नाटके थेट अमरावतीच्या स्पर्धेत कशी प्रश्न पडला असेल. परंतु अमराठी भागातील नागरिकांनी सादर करावयाच्या मराठी कलाकृती दरवर्षी स्पर्धेत सादर होत असतात. यावर्षी जळगाव व नाशिक या केंद्रांवरही प्रत्येकी दोन नाटके सादर केली जाणार आहेत.

खासदारांच्या हस्ते उद्घाटन
महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचे उद्घाटन सोमवार ५ डिसेंबरला सायंकाळी ७ वाजता होणार असून खासदार डॉ. अनिल बोंंडे, खासदार नवनीत राणा, आमदार डॉ. रणजित पाटील, नाट्य परिनिरीक्षण मंडळाचे सदस्य शिवराय कुलकर्णी, माजी महापौर तथा मराठी नाट्य परिषदेचे उपाध्यक्ष विलास इंगोले याप्रसंगी प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. या स्पर्धेद्वारे अमरावती मधील ९ आणि मध्य प्रदेशातील २ अशा एकूण ११ नाटकांची मेजवानी आहे.

बातम्या आणखी आहेत...