आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमरावतीत राज्यस्तरीय बाल नाट्य स्पर्धेला सुरूवात:खादाड, कस्तुरी, नवे गोकुळ, जाईच्या कळ्या नाटकांचा समावेश

अमरावतीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यस्तरीय नाट्य स्पर्धेच्या यशस्वी आयोजनानंतर अमरावतीत बालनाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी सुरु झाली आहे. या स्पर्धेंतर्गत पहिल्याच दिवशी पाच नाटकांचे सादरीकरण झाले असून यावर्षी एकूण 40 नाटकांचे सादरीकरण केले जाणार आहे. या स्पर्धेचा शुभारंभ नाट्य चळवळीतील स्थानिक पदाधिकारी आणि परीक्षक, मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.

विदर्भ महाविद्यालय परिसरातील संगीतसूर्य केशवराव भोसले सभागृहात ही स्पर्धा सुरु असून ती सकाळी 10 वाजता सुरु होते. दरम्यान पहिल्याच दिवशी सई परांजपे लिखित व निलेश ददगल दिग्दर्शीत "जादूचा शंख", आसिफ अन्सारी लिखित व शुभम ठाकरे दिग्दर्शीत "आम्ही नाटकं करित आहोत", गणेश वानखडे लिखित व दिग्दर्शीत "खेळ मदरिवाल्याचा", डॉ. श्याम देशमुख लिखित व चंदा धुमाळ दिग्दर्शीत "अनाथ", आणि अजिंक्य कुरळकर दिग्दर्शीत "एकला चलो रे" या बालनाट्याचे सादरीकरण झाले.

यांचा सहभाग

संपूर्ण राज्यभर वेगवेगळ्या केंद्रावर बालनाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीला सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार आणि सांस्कृतिक कार्य संचालक बिभीषण चवरे यांच्या मार्गदर्शनात सुरुवात झाली असून अमरावती केंद्रावर अकोला, वाशीम, बुलढाणा, अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यातून नाटकांचे संघ सहभागी झाले आहेत.

यांना मिळाले पारितोषिक

नाट्य परिषदेच्या अमरावती शाखेचे उपाध्यक्ष ऍड. प्रशांत देशपांडे यांचे अध्यक्षतेखाली या स्पर्धेचे उद्घाटन पार पडले. यावेळी राज्य नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीतील पुरुष अभिनयाचे प्रथम पारितोषिक (रौप्य पदक) प्राप्त अभिनेते विराग जाखड आणि महिला अभिनयाचे प्रथम पारितोषिक (रौप्य पदक) विजेत्या प्राची ढोक प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या.

या परिक्षकांची नियुक्ती

या स्पर्धेकरिता शासनाने नियुक्त केलेले तिन्ही परीक्षक लक्षमीकांत देशपांडे (अहमदनगर), पियुष नाशिककर (नाशिक) आणि मधुमती जोगळेकर-पवार (मुंबई) सुद्धा रंगमांच्यावर उपस्थित होत्या. विराग जाखड यांनी उदघाटनाची घोषणा केली आणि आपल्या अध्यक्षीय भाषणात ऍड. प्रशांत देशपांडे यांनी स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या.

नाट्य परिषदेच्यावतीने प्रा. मंगेश बक्षी, मनोज सामदेकर, प्रा. अनिल प्रांजळे, अभिजित देशमुख आणि अॅड. श्रद्धा पाटेकर यांनी पुष्पगुछ आणि स्मृतिचिन्ह देऊन मान्यवरांचे स्वागत केले. या उदघाट्न समारंभाचे संचालन स्पर्धा समन्वयक ऍड. चंद्रशेखर डोरले यांनी केले. ही स्पर्धा विनामूल्य असून बाल कलाकारांचा उत्साह वाढविण्यास रसिकांनी वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन सहसमन्वयक विशाल फाटे यांनी केले आहे.

कसदार लेखक, दिग्दर्शकांची नाटके

नाटकांमध्ये येथील कसदार दिग्दर्शकांनी दिग्दर्शित केलेल्या नाटकांचा समावेश आहे. त्यानुसार खादाड, कस्तुरी, नवे गोकुळ, जाईच्या कळ्या, कुपीतलं गुपित, अनाथ, नातं, तेजोमय, पृथ्वी, अँड्राईड, काळोख, एक नवाब, बुलेट ट्रेन, माकडचाळे, खरा तो एकची धर्म आदी नाटके बघायला मिळतील.

बातम्या आणखी आहेत...