आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिलासा:जिल्हा क्रीडा संकुलासह विभागीय संकुलातही अत्याधुनिक सुविधा; शासनाकडून अनुदान मर्यादेत वाढ, पालकमंत्री ॲड. ठाकूर यांची माहिती

अमरावती22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शासनाने विभागीय व जिल्हा क्रीडा संकुलांच्या अनुदान मर्यादेत वाढ केल्यामुळे संकुलांमध्ये अद्ययावत सुविधा निर्माण होणार आहेत. विभागीय संकुलात अद्ययावत सुविधांची निर्मिती करतानाच अमरावती येथे सुसज्ज जिल्हा क्रीडा संकुल निर्मितीलाही वेग द्यावा, असे निर्देश राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी सोमवारी आयोजित बैठकीत संबधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.

जिल्हा तसेच विभागीय क्रीडा संकुलांच्या कामांबाबत पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली, त्यावेळी त्या बोलत होत्या. विभागीय आयुक्त पीयूष सिंह, जिल्हाधिकारी पवनीत कौर, विभागीय क्रीडा उपसंचालक विजय संतान, जिल्हा क्रीडा अधिकारी वर्षा साळवी, माजी महापौर विलास इंगोले, माजी महापौर मिलिंद चिमोटे, माजी विरोधी पक्षनेते बबलू शेखावत, शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. अंजली ठाकरे आदी उपस्थित होते.

राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांत सहभागी खेळाडूंची मोठी परंपरा अमरावती जिल्ह्याला आहे. विभागीय व जिल्हा क्रीडा संकुलांसाठीची अनुदान मर्यादा शासनाने वाढवल्याने अधिकाधिक सुविधा येथे निर्माण होणार आहेत. अमरावती जिल्ह्यातील क्रीडाप्रेमी नागरिकांसाठी उत्तम व सुसज्ज क्रीडा संकुले उपलब्ध होणार आहेत, असे पालकमंत्री अॅड. ठाकूर यांनी सांगितले. जिल्हा क्रीडा संकुलाची अनुदान मर्यादा २५ कोटी रुपये इतकी वाढवण्यात आली आहे.

त्यामुळे ४०० मीटर सिंथेटिक धावनपथ, फुटबॉल पॉलिग्रास क्रीडांगण, सिंथेटिक लॉन टेनिस कोर्ट, स्केटिंग रिंग, कबड्डी, खो-खो, व्हॉलीबॉल या खेळाची किमान प्रत्येकी २ क्रीडांगणे, अंतर्गत रस्ते, जलतरण तलाव, हॉकी ॲस्ट्रोटर्फ क्रीडांगण, बहुउद्देशीय सभागृह आदी सुविधा निर्माण होणार आहेत. जिल्हा क्रीडा संकुल उभारणी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या गेटसमोरील जागेत होत आहे. तथापि, वाढीव अनुदानानुसार विविध क्रीडा सुविधा निर्मितीसाठी तिथे आवश्यक जागा उपलब्ध नाही. त्यामुळे काही सुविधा नांदगावपेठ व इतर ठिकाणी उभारण्यात येतील. ही सर्व कामे वेळेत पूर्ण व्हावीत. नाविन्यपूर्ण योजनेत मोर्शी, तिवसा, दर्यापूर या ठिकाणी क्रीडा सुविधांची कामे नियोजनानुसार वेळेत पूर्ण करावीत, असेही निर्देश त्यांनी दिले.

बातम्या आणखी आहेत...