आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायेथील सायन्स्कोर मैदानात सुरु असलेल्या कृषी प्रदर्शनात महिला बचत गटांच्या उत्पादनांना उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. कृषी विभाग व महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्या सहकार्याने हा महोत्सव सुरू आहे. नैसर्गिक शेती, तृणधान्य व जिल्हास्तरीय कृषी महोत्सवाचा आजचा दुसरा दिवस आहे. हा महोत्सव ५ मार्चपर्यंत चालणार आहे. यात भरडधान्यापासून तयार करण्यात आलेले पौष्टिक व चविष्ट पदार्थ विक्रीस उपलब्ध आहेत. या पदार्थांना ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा यांच्या हस्ते महोत्सवाचा शुभारंभ झाला. या माध्यमातून ग्रामीण महिलांचे संघटन, त्यांची क्षमता बांधणी, उद्योजकता विकास साध्य झाला.
महिलांमध्ये आत्मविश्वास वाढून त्यांचा उद्योजकीय विकास घडवून आणण्याचा उद्देश यशस्वी झाला. दरम्यान त्यांनी तयार केलेल्या वस्तूंची बाजारपेठेशी सांगड घालून देण्याचे काम सरकारमार्फत केले जाते. स्वयंसहायता महिला बचत गटांनी येथे ४६ स्टॉल्स लावले आहेत. यापैकी ४० स्टॉलवर विविध हस्तकलेच्या वस्तू तसेच तयार खाद्य पदार्थ, धान्ये यांची विक्री सुरु आहे. तर उर्वरित सहा स्टॉल्सवर महोत्सवातच खानावळीचे स्टॉल्स लागले आहेत. बरेचदा महिला बचतगट म्हटले की केवळ घरगुती खाद्य पदार्थांची निर्मिती व विक्री होत असावी, असे वाटते. परंतु एका बचत गटाने एलएडी दिव्यांची निर्मिती करुन विक्री सुरु केली आहे. प्लास्टिकवर बंदी असल्यामुळे सर्वत्र खरेदीसाठी कापडी पिशवीची मागणी होत आहे. यासाठी महिला बचतगटांनी कापडी पिशवींची निर्मिती उद्योग सुरु केला आहे.
घरचे कामकाज सांभाळून रिकाम्या वेळेत गावातच महिला हा व्यवसाय करतात. यामध्ये दैनंदिन वापरामध्ये तसेच इतर कार्यक्रमांमध्ये वापरण्यात येणाऱ्या कापडी पिशवी माफक दरात उपलब्ध आहेत. दहा रुपयांपासून तीनशे रुपयांपर्यंत पिशवीची किंमत आहे. मारकामाय स्वयंसहायता महिला बचतगट, रिध्दपूर यांच्यामार्फत मुर्ती काम व कुंभार काम व्यवसाय चालविला जातो. दहा महिला एकत्रित येऊन मुर्ती काम करतात. यामध्ये देवी-देवता, महापुरुषांच्या आकर्षक व सुबक मूर्ती, पणत्या ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.