आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराओबीसींचे आरक्षण थांबवल्याने सर्वदूर सुरू असलेल्या गोंधळाचा फटका जिल्ह्यातील चांदूर रेल्वे, तिवसा व धामणगाव रेल्वे या तीन पंचायत समित्यांनाही बसला आहे. त्यामुळेच या पंचायत समित्यांमध्ये सभापतींऐवजी केवळ उपसभापतींची निवडणूक घेतली जात असून त्यासाठीचा कार्यक्रम आज, बुधवारी घोषित झाला. निवडणुकांच्या इतिहासात मुख्य पद सोडून दुय्यम पदासाठीची निवडणूक घेतली जाण्याची ही बहुदा पहिलीच वेळ आहे.
जिल्हा परिषदेचे प्रशासक तथा प्रभारी जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी याबाबतचे वेळापत्रक घोषित केले असून १५ जून रोजी दुपारी २ वाजता तिन्ही पंचायत समित्यांमध्ये उपसभापतीपदाची निवडणूक घेतली जाईल. त्यानंतर त्यांनाच प्रभारी सभापती म्हणून कारभार चालवण्याची संधी मिळणार आहे. चांदूर रेल्वे, तिवसा व धामणगाव रेल्वे पंचायत समित्यांच्या सभापती, उपसभापतींचा कार्यकाळ येत्या २४ जून रोजी संपुष्टात येत आहे. ओबीसी आरक्षणाचा प्रश्न रखडल्यामुळे शासनाने राज्यभरातील पंचायत समित्यांचे सभापती, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष यांच्या आरक्षणाची सोडत थांबविली आहे. त्यामुळे नवे सभापती कोणत्या संवर्गाचे निवडावे, हा यंत्रणेपुढील प्रश्न होता. परिणामी ती निवडणूक थांबवून सर्वांसाठी खुली असलेली उपसभापती पदांचीच निवडणूक घेतली जावी, असा पर्याय शोधण्यात आला आहे. धामणगाव रेल्वे तालुक्याच्या निर्मितीपासून चांदूर रेल्वे, तिवसा व धामणगाव रेल्वे या तीन पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुका इतर पंचायत समित्यांसोबत न घेता स्वतंत्रपणे घेतल्या जातात.
त्यामुळे इतर ठिकाणी सध्या प्रशासक राज असले तरी या तिन्ही स्थानिक स्वराज्य संस्थांमधील पदाधिकारी अद्याप कायम आहेत. धामणगाव रेल्वे येथे महादेवराव सोमोसे, तिवस्यात शिल्पाताई हांडे आणि चांदूर रेल्वे येथे सुलोचना जांबे यांच्या हातात सभापती म्हणून त्या-त्या ठिकाणच्या पंचायत समित्यांची सत्ता आहे. या सर्वांचा कार्यकाळ आगामी २४ जून रोजी संपुष्टात येत आहे. त्यामुळे त्याआधी नव्या सभापतींची निवड करुन घेणे आवश्यक आहे. त्याचाच एक भाग म्हणून १५ जूनला निवडणूक घेतली जाणार आहे.
प्रभारी जिल्हाधिकारी पंडा यांनी तसे आदेश तिन्ही ठिकाणच्या तहसीलदारांना दिले असून निवडणुका घेण्यास निर्देशित केले आहे. जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार १५ जूनच्या निवडणूक बैठकीची सूचना आगामी ५ जून रोजीच पंचायत समित्यांच्या सदस्यांना,पाठविली जाईल. त्यानंतर १५ जूनला सकाळी ११ ते दुपारी १ या वेळात उपसभापती पदांसाठी उमेदवारी अर्ज भरुन घेतले जातील. त्यानंतर दुपारी २ वाजता निवडणूक बैठकीला प्रारंभ होणार असून पहिल्या दहा मिनीटात उमेदवारी अर्जांची छाननी करुन उमेदवारांची अंतीम यादी घोषित केली जाईल. ही यादी घोषित केल्यानंतर १५ मिनीटांचा अवधी अर्ज मागे घेण्यासाठी दिला जाईल. या दरम्यान ज्या ठिकाणी एकाहून अधिक अर्ज उरतील, तेथे मतदानाने निवडणूक घेतली जाईल.
...म्हणून घेतली जात आहे उपसभापतींची निवडणूक
तिन्ही पं. स.च्या सभापती-उपसभापतींचा कार्यकाळ २४ जून रोजी संपुष्टात येत आहे. सभापतींसाठीचे आरक्षणच अनिर्णित असल्याने केवळ उपसभापतींची निवडणूक घेतली जात आहे. त्यांनाच प्रभारी सभापती म्हणून काम करावे लागणार आहे.
- अविश्यांत पंडा, प्रभारी जिल्हाधिकारी, अमरावती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.