आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पदभार स्वीकारला:अल्पवयीनांची गुन्हेगारी रोखण्यासाठी प्रयत्नशील; नवे पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांची माहिती

अमरावती2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अनेक प्रकरणात अल्पवयीन गुन्हेगार असल्याचे समोर येते, अनेकदा गंभीर गुन्ह्यातही अल्पवयीनांचा प्रामुख्याने वापर करुन घेतला जातो. त्यामुळे आता शहरातील प्रत्येक ठाण्यात ‘टॉप २०’ गुन्हेगारांच्या यादीसोबतच अल्पवयीन गुन्हेगारांची यादी तयार करण्यात येईल.

त्यानंतर संबंधित गुन्हेगारांचे समुपदेशन करण्यात येईल, त्यांच्या सुधारणेसाठी पुरेपूर प्रयत्न केले जातील तसेच त्यांच्या पालकांना समज देवू, गरज पडल्यास अल्पवयीन गुन्हेगारांच्या पालकांविरुद्ध गुन्हे दाखल करु. अल्पवयीनांची गुन्हेगारी नियंत्रणासाठी आवश्यक ती सर्व पावलं उचलणार, असे नवनियुक्त पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी सांगितले. बुधवारी (दि. २१) सकाळी नवे पोलिस आयुक्त रेड्डी यांनी मावळत्या पोलिस आयुक्त डॉ. आरती सिंह यांच्याकडून पदभार स्वीकारला. त्यावेळी ते माध्यमांसोबत बोलत होते. बुधवारी सकाळी त्यांनी अमरावती पोलिस आयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारला आहे. रेड्डी यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर पोलिस उपायुक्त सागर पाटील व पोलिस उपायुक्त विक्रम साळी यांच्याकडून आयुक्तालयाचा प्राथमिक आढावा घेतला. ते म्हणाले,सर्वसामान्यांना केंद्रस्थानी ठेवून काम करणार आहे.

याचवेळी पोलिसांचा समाजात आवश्यक त्या ठिकाणी ‘प्रेझेन्स’ महत्वाचा आहे. तसेच जो काम करेल तोच टिकेल, काम न करणाऱ्यांचा निश्चितच वेगळा विचार केला जाईल. शहर व ग्रामीण भागात काम करण्याचा अनुभव वेग वेगळा असतो. मालमत्ताविषयक, महिला व बालकांवरील गुन्हे नियंत्रित ठेवण्यावर आपला भर असणार आहे.

सायबर क्राइम आव्हान
अलीकडे सायबर क्राइम हे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे.सायबर क्राइम रोखण्यासाठी नागरिकांनी अधिक अलर्ट असायला पाहिजे, सेक्सटॉर्शनचे प्रकार अलीकडे समोर येत आहेत, त्यामुळे नागरिकांनी स्वत:ची फसवणूक होणार अशा पद्धतीने समाज माध्यमांचा वापर करावा, तसेच काही समस्या व तक्रार असल्यास तत्काळ पोलिसांसोबत निःसंकोचपणे संपर्क करावा. सायबर गुन्हे सायबर पोलिस ठाण्याव्यतिरिक्त ठाण्यातील अधिकारी, अंमलदार सुद्धा आता हाताळू शकणार आहेत,असेही रेड्डी म्हणाले. यावेळी रेड्डी यांनी जनतेसाठी त्यांचा संपर्क क्रमांक (८५५१९३१०००) जाहीर केला.

बातम्या आणखी आहेत...