आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादिल्लीच्या नामांकित महाविद्यालयात प्राध्यापिका असलेल्या सीमा जोगड (श्रीवास्तव) यांनी त्यांच्या मैत्रिणीच्या हाकेला ओ देत त्यांच्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना स्वेटर, टोप्या पुरवल्या. ऐन गरजेच्या दिवसांत ही मदत मिळाल्याने सर्व विद्यार्थी आनंदित झाले असून, त्यांनी व त्यांच्या पालकांनी सदर प्राध्यापिकेचे व शाळेतील शिक्षिकेचे आभार मानले आहेत.
सीमा जोगड गेल्या अनेक वर्षांपासून प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहेत. पर्यावरणात रस असल्याने स्वखर्चातून त्या अनेक सामाजिक उपक्रमांचे आयोजन करत असतात. कधी विद्यार्थ्यांना सायकल वाटप, तर कधी मुलींना शैक्षणिक व वैयक्तिक स्वच्छतेसंबंधी साहित्याचे वाटप हे त्यांचे नेहमीचे सेवाकार्य आहे. त्यांची बालमैत्रीण वर्षा सुपट्यान यांच्याशी झालेल्या गप्पांमधून जिल्हा परिषदेच्या शाळेतील मुलांना हिवाळ्याच्या दिवसात स्वेटर नसल्याचे त्यांनी ऐकले आणि स्वतः पुढाकार घेत मैत्रिणीच्या शाळेसह चांगल्या काम करणाऱ्या शिक्षकांच्या दोन शाळांतील सुमारे दीडशे मुलांना स्वेटरचे गिफ्ट देत अनोखी ऊब पोहोचवली.
विदर्भातील लोणार येथील रहिवासी असलेल्या सीमा व वर्षा या दोन्ही मैत्रिणी लग्नानंतर वेगवेगळ्या ठिकाणी स्थायिक झाल्या. दोघीही शिक्षण क्षेत्रात कार्यरत असल्याने सोशल मीडियाद्वारे सहज त्यांची चर्चा व्हायची. चांदूर रेल्वे येथील निंभा येथील जि. प. शाळेच्या शिक्षिका वर्षा सुपट्यान यांनी माझे विद्यार्थी परिस्थिती अभावी स्वेटरशिवाय शाळेत येतात.
ग्रामीण भागात परिस्थिती व मैत्रिणीची विद्यार्थ्यांप्रती असलेली तळमळ बघता सीमा जोगड यांनी स्वतः विद्यार्थ्यांना हवे ते स्वेटर देणार असल्याचे सांगितले. तसेच बासलापूर व चिंचपूर या शाळेतील एकूण दीडशे विद्यार्थ्यांना स्वेटर व कानटोपी देण्यासाठी त्यांनी तत्काळ पैसे पाठवले. यापूर्वी दिवाळीच्या सुटीत त्यांनी लोणार येथील आपल्या सर्व गुरुजनांना एकत्रित आणत ‘गुरूसन्मान’ सोहळ्याचे आयोजन केले होते.
पर्यावरणपूरक उपक्रमाचा छंद
शास्त्र विभागाच्या अधिव्याख्याता म्हणून कार्यरत असलेल्या सीमा जोगड यांना पर्यावरणाचे वेड आहे. आपल्या पर्यावरण प्रेमाला कृतीची जोड देत त्यांनी प्लास्टिक मुक्त वावर, वृक्षारोपण, झिरो वेस्ट, इको फ्रेंडली गिफ्ट, इको फ्रेंडली भंडारा, पक्ष्यांसाठी जलपात्र, नैसर्गिक साबण, इको फ्रेंडली गणपती यासह कॅन्सरग्रस्त रुग्णांसाठी केशदान, मुलींसाठी शैक्षणिक व वैयक्तिक स्वच्छतेसंबंधी साहित्याचे वाटप आदी विविध उपक्रम स्वखर्चातून राबवले आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.