आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वुई वाँट ऑनलाइन एक्झाम:ऑनलाइन परिक्षेसाठी विद्यार्थी झाले आक्रमक; ‘एनएसयूआय’च्या नेतृत्वात विद्यापीठात धडकले

अमरावती15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पत्रके भिरकावून निषेध; पोलिसांशी धक्काबुक्की, शाब्दिक वादानंतर ठिय्या

विद्यापीठाच्या परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्यात याव्यात या मागणीसाठी शुक्रवारी एनएसयूआय (नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया) संघटनेच्या नेतृत्वात शेकडो विद्यार्थ्यांनी अमरावती विद्यापीठावर धडक दिली. मोर्चा विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारापासून प्रशासकीय इमारतीत कुलगुरूंना निवेदन देण्यासाठी जाणार होता. मात्र, पोलिसांनी विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावरच विद्यार्थ्यांना अडवले.

विद्यार्थी मात्र, पोलिसांना न जुमानता थेट प्रशासकीय इमारतीसमोर येऊन धडकले. यावेळी पोलिस आणि विद्यार्थ्यांमध्ये शाब्दिक वाद झाला. यामुळे परिसरात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाल्याने पोलिस आणि विद्यार्थ्यांमध्ये धक्काबुक्कीही झाली. यावेळी संतप्त विद्यार्थ्यांनी कुलगुरू विरोधात जोरदार घोषणाबाजी करत इमारतीबाहेर ठिय्या दिला. यावेळी विद्यार्थ्यांकडून ऑनलाइन परीक्षेची मागणी करण्यात आली.

एनएसयुआयच्या म्हणण्यानुसार अमरावती विद्यापीठाची घेण्यात येणारी उन्हाळी परीक्षा ही विद्यार्थ्यांना गोंधळात टाकणारी आहे. कोरोनामुळे गेल्या दोन वर्षात ऑनलाइन शिक्षण आणि परीक्षा घेण्यात आल्या. मात्र, यंदा कोरोना कमी झाल्यामुळे विद्यापीठांनी परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेण्याचे नियोजन केले आहे. हा निर्णय चुकीचा असून अर्ध्या पेक्षा जास्त शैक्षणिक वर्ष हे ऑनलाइन शिक्षणात गेले आहे. त्यामुळे परीक्षा ही विद्यापीठाने ऑनलाइन घ्याव्यात अशी मागणी विद्यार्थ्यांची असल्याचे एनएसयूआयचे म्हणणे आहे. या मागणीसाठी याआधी संघटनेने मोर्चा काढला होता.

मात्र, विद्यापीठ प्रशासनाने दखल घेतली नाही, असा आरोप विद्यार्थ्यांनी केला. त्यामुळे या विरोधात शुक्रवारी विद्यापीठावर मोर्चा काढण्यात आल्याची प्रतिक्रिया आंदोलक विद्यार्थ्यांनी दिली. तत्पूर्वी मोर्चाला पोलिसांनी विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर अडविले. मात्र एनएसयूआयचे कार्यकर्ते विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारावर चढले.

यानंतर विद्यार्थ्यांनी बंद असणाऱ्या प्रवेशद्वारावरून उड्या मारून विद्यापीठाच्या आवारात प्रवेश केला. यानंतर एनएसयूआयचा मोर्चा थेट विद्यापीठाच्या प्रशासकीय कार्यालयासमोर येऊन धडकला. या दरम्यान पोलिसांनी या मोर्चाला अडवण्याचे प्रयत्न केले, परंतु या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी विद्यार्थ्यांना अडवण्याचा प्रयत्नात पोलिसांची दमछाक झाली. विद्यापीठातील सुरक्षारक्षकांनी प्रशासकीय इमारतीचे दार बंद केले. या ठिकाणी उपस्थित पोलिस आणि विद्यार्थ्यांमध्ये तणाव निर्माण झाला.

यावेळी संतप्त आंदोलन विद्यार्थी आणि पोलिसांमध्ये धक्काबुक्कीही झाली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी इमारतीच्या प्रवेशद्वारासमोर ठिय्या दिला. तसेच कुलगुरूंच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी राष्ट्रीय महासचिव नागेश करिअप्पा, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आमिर शेख, महासचिव आकांक्षा ठाकूर, जिल्हाध्यक्ष संकेत कुलट, नीलेश गुहे, योगेश बुंदेले, आकाश कावडे, ऋग्वेद सरोदे, उत्कर्ष देशमुख सह शेकडो विद्यार्थी व संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...