आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी ग्रामीण भागातील ग्रामस्थांच्या समस्या सोडवण्यासाठी पुढे येण्याची गरज असून त्यादृष्टीने रासेयो स्वयंसेवक कार्य करीत असल्याचे प्रतिपादन संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप मालखेडे यांनी केले. स्वच्छ भारत-स्वस्थ भारत व बळीराजा चेतना अभियानांतर्गत सात दिवसीय रासेयो शिबिर आकोट तालुक्यातील देऊळगाव (गावंडे) येथे पार पडले. त्याच्या समारोपीय कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून कुलगुरू बोलत होते.
या वेळी अध्यक्षस्थानी श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे कार्यकारिणी सदस्य केशव मेतकर, केशवराव गावंडे, प्राचार्य डॉ. सुनील पांडे, प्राचार्य डॉ. प्रशांत कोठे आदी उपस्थित होते. पुढे बोलताना कुलगुरू म्हणाले, रासेयोच्या विद्यार्थ्यांनी ग्रामस्थांपर्यंत पोहोचून विविध शासकीय योजनांची माहिती त्यांना देणे, त्या समजावून सांगणे, त्या योजनांचा लाभ घेण्यासाठी सहकार्य करणे, ही जबाबदारी खांद्यावर घेतली पाहिजे. नवीन तंत्रज्ञान आत्मसात करीत त्यांनी ग्राम दूत म्हणून पुढे येवून ग्रामस्थांच्या ज्ञानात भर घालावी, असे आवाहनही त्यांनी या वेळी विद्यार्थ्यांना केले. उन्नत भारत अभियानांतर्गत ग्राम विकासामध्ये संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे योगदानात्मक प्रयत्न सातत्याने सुरू असून, गावांचा विकास करण्यामध्ये विद्यापीठाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा हातभार मोठा असेल, असेही ते म्हणाले.
समारोपीय कार्यक्रमाचे प्रास्ताविक रासेयो संचालक डॉ. राजेश बुरंगे यांनी केले. पाहुण्यांचा परिचय डॉ. गजानन तायडे यांनी दिला. सूत्रसंचालन महिला कार्यक्रम अधिकारी डॉ. स्नेहल रोडगे, तर आभार रासेयो जिल्हा समन्वयक डॉ. आर. एल. येऊल यांनी मानले. कार्यक्रमाला जवळपास १५० रासेयो स्वयंसेवक उपस्थित होते.
शिबिरादरम्यान राबवले समाजोपयोगी उपक्रम
‘स्वच्छ भारत-स्वस्थ भारत’ व बळीराजा चेतना अभियानांतर्गत रासेयो विशेष श्रम संस्कार शिबिरामध्ये व्यक्तिमत्व विकास कार्यशाळा, स्वच्छ भारत-स्वस्थ भारत अभियान, बळीराजा चेतना अभियान, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीयत्व निर्माण करणे, श्रमदानातून बंधारा आणि पंधरा शेततळ्यांची निर्मिती आदी उपक्रम राबवल्याची माहिती प्राचार्य डॉ. कोठे यांनी दिली.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.