आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासापन नदीच्या प्रवाहाने गेल्या मंगळवारी (दि. १९) जुळ्या शहराला पाणी पुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी वाहून गेली होती. त्यामुळे शहरातील नागरिक भर पावसात ही पिण्याच्या पाण्यासाठी गेल्या आठवडाभरापासून वणवण करत आहेत. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाने रात्रंदिवस काम करत या जलवाहिनीचे काम पूर्ण केले आहे. काँक्रिटीकरणाचे काम केल्यानंतर एका दिवसानंतर पाणी सोडणे सोयीचे ठरेल म्हणून हा पाणीपुरवठा आता मात्र गुरुवारपासून (दि. २८) सुरळीत केला जाणार असल्याची माहिती मजीप्राचे उपअभियंता सत्यम पाटील यांनी दिली.
देवगाव जलशुद्धीकरण केंद्रावरून शहरात येणारी मुख्य जलवाहिनी १९ जुलै रोजी सापन नदीच्या पात्रात प्रवाहाने तुटली होती. त्यानंतर ही जलवाहिनी दुरुस्तीसाठी दोन दिवस पाण्याचा विसर्ग कमी होण्याची वाट पाहून सापन धरणाचे दरवाजे बंद करीत २२ व २३ जुलैला जलवाहिनी पालिकेच्या वतीने दुरुस्तीचे काम प्रारंभ करण्यात आले. २४ जुलै रोजी काम पूर्ण होताच काही तासानंतरच धरणातून पाण्याचा विसर्ग झाल्याने जलवाहिनी पाण्यातच वाहून गेली. त्यामुळे पालिका प्रशासन हतबल झाले. अखेर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला सापन नदीवरील पुलावरून जलवाहिनी टाकण्याची जबाबदारी जिल्हा प्रशासनाकडून निश्चित करण्यात आली. मजीप्राने तत्काळ २४ जुलै रोजी काम हातात घेत रात्र-दिवस एक करीत पुलावरून जलवाहिनी टाकून २५ जुलै रोजी एका भागातील जलवाहिनी जोडणी सुध्दा केली. मंगळवारी (दि. २६) जलवाहिनीचे संपूर्ण काम करण्यात आले. सुरक्षेच्या अनुषंगाने जलवाहिनीचे काँक्रिटीकरण करणे आवश्यक असते. मात्र दुपारपासून पाऊस सुरू झाल्याने काँक्रिटीकरणाचे काम मंदावले होते. मात्र काँक्रिटीकरणाचे काम पूर्ण करणे जलवाहिनी सुरक्षेसाठी महत्त्वाचे असल्याने गुरुवारपासून जलवाहिनीतून पाणीपुरवठा सुरळीत केले जाणार असल्याची माहिती मजीप्रा प्रशासनाद्वारे देण्यात आली.
जोडलेली जलवाहिनी खंडित होऊ नये म्हणून काँक्रिटीकरण
अचलपूर नगर पालिका पाणीपुरवठा विभागाच्या अखत्यारीत जलवाहिनी नादुरुस्त झाल्याने दुरुस्तीचे काम मजीप्राकडे सोपवण्यात आले होते. मजीप्राने तांत्रिक बाबी लक्षात घेत व शहरवासीयांना तत्काळ पाणीपुरवठा करण्याकरिता वेगाने काम सुरु करण्यास प्राधान्य दिले. दोन दिवसात जलवाहिनी जोडणीचे काम पूर्ण झाले असून पाणी सोडल्यानंतर दबावाने जोडलेल्या ठिकाणी जलवाहिनी खंडीत होवू नये याकरिता काँक्रिटीकरण करणे महत्त्वाचे आहे. झालेले काँक्रिटीकरण पक्के होण्यासाठी काही काळ वाट पाहणे आवश्यक आहे. त्यामुळे जलवाहिनी जोडली गेली असली, तरी पुढील समस्या निर्माण होवू नये म्हणून गुरुवारी या जलवाहिनीतून पाणीपुरवठा करण्यात येईल.
- सत्यम पाटील, उपअभियंता, मजीप्रा
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.