आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:सुपर स्पेशालिटीत रुग्णावर किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वी

अमरावती9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आईच्या किडनी दानातून मुलाला लाभला नवा जन्म

किडनीच्या आजाराने त्रस्त असलेल्या युवकावर विभागीय संदर्भ रुग्णालयाच्या (सुपर स्पेशालिटी हाॅस्पिटल) चमूने किडनी प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया केली. या युवकाला त्याच्या आईने किडनी दिली असून, शस्त्र क्रियेमुळे बरा झाल्यानंतर युवकास गुरुवार,दि. ४ ऑगस्ट रोजी घरी जाण्याची अनुमती देण्यात आली. जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी याप्रसंगी उपस्थित राहून युवकाशी संवाद साधला व त्याला शुभेच्छा दिल्या. डॉ. श्रीकांत महल्ले, डॉ. मंगेश मेंढे यावेळी उपस्थित होते.

अमर खराटे हा युवक बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव येथील रहिवासी असून, त्याचे वय ३६ वर्षांचे आहे. त्याच्या आई रत्नमाला खराटे या ५८ वर्षांच्या आहेत. खराटे यांना गत अडीच वर्षांपासून किडनीचा विकार होता. त्यांना शस्त्रक्रियेबाबत सल्ला डॉक्टरांनी दिला होता. अमरच्या आई रत्नमाला खराटे यांनी आपल्या मुलाला किडनी देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सुपर स्पेशालिटीत शस्त्रक्रिया करण्याचे निश्चित झाले. नेफ्रॉलॉजिस्ट डॉ. निखील बडनेरकर यांनी याबाबत मार्गदर्शन केले. आवश्यक त्या सर्व तपासण्या होऊन २१ जुलैला अमर यांना विभागीय संदर्भ रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर २२ जुलैला यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रियेनंतर बरे झाल्यामुळे त्यांना घरी जाण्याची डाॅक्टरांनी परवानगी दिली. शल्यविशारद डॉ. संजय कोलते, डॉ. राहुल पडोळे, डॉ. विक्रम देशमुख, डॉ. राहुल धुळे, तसेच बधिरीकरण तज्ज्ञ डॉ. प्रणीत घोडमारे, डॉ. पौर्णिमा वानखडे, डॉ. बाळकृष्ण बागवाले यांच्या चमूने ही शस्त्रक्रिया पूर्ण केली. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रमोद निरवणे, डॉ. श्रीकांत महल्ले यांनी मार्गदर्शन व सहकार्य केले. कोविडकाळानंतर विभागीय संदर्भ रुग्णालयात यशस्वीपणे पूर्ण झालेली ही १४ वी शस्त्रक्रिया आहे. रुग्णालयात तज्ज्ञांची चमू, विशेषोपचार उपलब्ध आहेत. गरजूंनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केले.

बातम्या आणखी आहेत...