आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आत्महत्या:लग्नाच्या वाढदिवशी विवाहितेची आत्महत्या

अमरावती5 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

२१ नोव्हेंबरला पहिली ‘मॅरेज अॅनिव्हर्सरी’ असल्यामुळेच पती, पत्नी दोघेही चिखलदऱ्याला गेले होते. दरम्यान पत्नीने पतीला एक दिवस आणखी थांबू, असे म्हटले. मात्र पतीने भांडण करून तिला घरी परत आणले. काही दिवसांपासून पती व कुटुंबातील अन्य सदस्य सतत विवाहितेला त्रास देत हाेते. त्यामुळे या छळाला कंटाळून विवाहितेने सोमवारी रात्री घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली. नांदगाव पेठ पोलिसांनी मृतक विवाहितेच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून मंगळवारी पतीसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

स्नेहल गोविंद सावध (रा. गणेशनगर, देशमुख लॉन परिसर, अमरावती) असे मृतक विवाहितेचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी गोविंद प्रकाशराव सावध, आशिष प्रकाशराव सावध व एका महिलेविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलिस तक्रारीनुसार, स्नेहल व गोविंद यांचा २१ नोव्हेंबर २०२१ ला विवाह झाला होता. त्यानंतर गोविंद व त्याच्या कुटुंबातील सदस्य मुलीला त्रास देत होते. माहेराहून १ लाख रुपये घेऊन ये, असे म्हणून मानसिक व शारीरिक छळ करत होते.

दरम्यान लग्नाचा पहिला वाढदिवस असल्यामुळे मुलगी व गोविंद दोघे चिखलदरा गेले होते. आणखी एक दिवस चिखलदरा थांबू, असे मुलीने पती गोविंदला म्हटले होते, मात्र गोविंदने वाद घालून मुलीला परत अमरावतीत आणले. दरम्यान सोमवारी सायंकाळीच मुलीने आत्महत्या केली. पती व सासरच्या मंडळींनी १ लाख रुपयांची मागणी करून तिचा वारंवार शारीरिक व मानसिक छळ केल्यामुळेच आत्महत्या केल्याची तक्रार मृतक मुलीच्या वडिलांनी दिली आहे. दरम्यान सोमवारी सायंकाळी ६ वाजून ४० मिनिटांच्या सुमारास मृतक विवाहितेने तिच्या वडिलांना मेसेज करून ‘खूप त्रास होत आहे, पप्पा येथे सर्वांचा, आय अॅम सॉरी’ असा मेसेज केला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

बातम्या आणखी आहेत...