आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करावलगाव पोलिस ठाण्यात कार्यरत साहाय्यक पोलिस उपनिरीक्षक विजय किसनराव अडोकार (५४, रा. गगलानीनगर) यांनी त्यांच्या घरापासून काही अंतरावर एका झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना बुधवारी (दि. ११) सकाळी उघडकीस आली. आजारी असल्यामुळे वलगाववरुन शहरात बदली करण्याची मागणी पूर्ण न केल्यामुळे त्यांनी आत्महत्येचा निर्णय घेतला, असा आरोप कुटुंबीयांनी केला असून, तशी तक्रार फ्रेजरपुरा पोलिसांत दाखल करण्यात आली आहे. सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक विजय अडोकार हे वलगाव पोलिस ठाण्यात कार्यरत होते. आज पहाटे दरम्यान त्यांनी घरापासून काही अंतरावर एका झाडाला दुपट्ट्याच्या साहाय्याने गळफास घेतला. ही बाब परिसरातील नागरिकांच्या लक्षात आल्यावर कुटुंबीयांसह फ्रेजरपुरा पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व मृतदेहाला शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आले. दरम्यान, या घटना उजेडात आल्यावर विजय अडोकार यांच्या कुटुंबियांनी आक्रोश केला.
वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांविरोधात त्यांनी रोष व्यक्त केला. त्यानंतर कुटुंबीयांनी फ्रेजरपुरा ठाणे गाठले. यावेळी पोलिस उपायुक्त एम. एम. मकानदार यांच्यासोबत कुटुंबीयांनी चर्चा केली. दोषींवर गुन्हा दाखल होईपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याची भूमिका यावेळी नातेवाइकांनी घेतली होती. त्यानंतर मृत विजय अडोकार यांच्या पत्नी संगीता यांनी तक्रार दाखल केली. प्रकृतीच्या कारणामुळे विजय अडोकार यांनी बदलीसाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे अर्ज केला होता. परंतु, वारंवार अर्ज करूनही त्यावर कुठलीच कारवाई केली नाही. बदली न झाल्यामुळे व त्यांना याच गोष्टीचा त्रास झाल्यामुळे त्यांनी आत्महत्या केली आहे.
या तक्रारीची चौकशी करण्याचे आश्वासन दिल्यानंतर कुटुंबीयांनी मृतदेह ताब्यात घेऊन पार्थिवावर अंत्यसंस्कार केले आहेत. दरम्यान, बदलीसाठी वारंवार अर्ज करुन पोलिस आयुक्तांनी त्यांची बदली केली नाही तसेच वलगावचे ठाणेदार विजयकुमार वाकसे यांनी त्यांना निलंबनाची धमकी दिली, त्यामुळेच त्यांनी आत्महत्या केल्याचा आरोप संगीता अडोकार यांनी तक्रारी तून केला. अडोकार यांना पॅरालिससचा झटका आल्यामुळे ते ४ जानेवारीपासून रजेवर होते.
तक्रारीची सखोल चौकशी करणार: विजय अडोकार यांच्या पत्नी संगीता यांनी तक्रार दाखल केली आहे. तक्रारीच्या अनुषंगाने सखोल चौकशी करण्यात येईल,असे पोलिस उपायुक्त एम. एम. मकानदार यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.