आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाणी टंचाई:जलवाहिनीची दुरुस्ती लांबल्याने रविवार गेला कोरडा; आज शहराच्या काही भागाला पाणी मिळण्याची शक्यता

अमरावतीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मोर्शी तालुक्यातील सिंभोरा येथून तपोवनच्या जलशुद्धीकरण केंद्रात पाणी पोहोचवणारी दीड मीटर व्यासाची जलवाहिनी तिसऱ्या दिवशीही पूर्ववत होऊ शकली नाही. त्यामुळे अमरावती व बडनेरावासियांना आजचा दिवसही (रविवार) कोरडाच निभवावा लागला.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने याबाबत शुक्रवार, शनिवारी पाणीपुरवठा केला जाणार नाही, अशी सूचना आधीच जारी केली होती. परंतु दुरुस्ती कार्य लांबल्याने रविवार या तिसऱ्या दिवशीही पाणी पुरवठा होऊ शकला नाही. त्यामुळे आता सोमवारी कदाचित शहराच्या काही भागाला पाणीपुरवठा होऊ शकतो, असे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान नागपुरची खासगी यंत्रणा आणि रतन इंडिया या कारखान्यातील सुमारे २० कुशल कामगार अहोरात्र दुरुस्ती कार्य करीत आहेत. पाइपची लांबी सहा मीटर आणि रुंदी दीड मीटर असल्याने क्रेनच्या सहाय्याने त्याच्या हालचाली कराव्या लागतात. यामुळे या कामाला वेळ लागत असल्याचेही मजीप्राचे उपकार्यकारी अभियंता अजय लोखंडे यांनी स्पष्ट केले.

नेमके काय झाले होते ?
पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीतील सहा मीटर लांबीचा एक पाइप जीर्ण झाल्यामुळे पाण्याच्या दबावाने गुरुवारी सायंकाळी तो फुटला. रहाटगावनजिक ही घटना घडली होती. त्यामुळे तपोवनच्या जलशुद्धीकरण केंद्रात पोहोचणारे पाणी त्यादिवशीच खंडित झाले. परिणामी गुरुवारी सायंकाळपासून अमरावती व बडनेरा येथील पाणी पुरवठा बंद आहे.

पुढे काय होणार ?
जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम आटोपल्यानंतर म्हणजेच सहा मीटर लांबीचा पाइप बदलविल्यानंतर आधी जलवाहिनीची ट्रायल घेतली जाईल. ट्रायल फत्ते झाल्यानंतर नेहमीप्रमाणे सिंभोरा येथून पंपींग सुरु होईल. पंपींगला किमान सहा तास लागतात. या कालावधीत पाणी जलशुद्धीकरण केद्रातून टाक्यांमध्ये पोहोचते. एकदा शहराच्या विविध भागांतील जलकुंभ भरले गेले की त्यानंतर नागरिकांच्या घरापर्यंत पाणी सोडले जाईल.

बातम्या आणखी आहेत...