आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करावैज्ञानिक दृष्टीकोन रुजविण्यासाठी गेल्या चार दशकांपासून भूमिका मांडत ढोंगी बुवाबाबांचा कर्दनकाळ ठरलेल्या आणि जादुटोणा विरोधी कायदा निर्मितीसाठी प्रमुख भूमिका बजावणाऱ्या अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीस यावर्षीचा डॉ. गिरीश गांधी राष्ट्रीय सामाजिक कार्य पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. प्रा. श्याम मानव यांनी या समितीसाठी सर्वोच्च कामगिरी बजावली असून अमरावतीकरांनी नेहमीच अग्रभागी राहून त्यांना मदत केली आहे. या पार्श्वभूमीवर अमरावतीकरांसाठी ही अभिमानाची बाब आहे.
सी. मो. झाडे फाऊंडेशनच्या श्री. सत्यनारायण नुवाल गुरुकुल व्यसनमुक्ती केंद्राच्या (नागपुर) माध्यमातून २०१३ पासून देशात सर्वोत्तम सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्ती व सामाजिक संस्थांना हा पुरस्कार देण्यात येतो. १ लाख रुपये आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. संस्थेचे विश्वस्त नानाभाऊ समर्थ आणि बळवंत मोरघडे यांनी अलिकडेच या पुरस्काराची घोषणा केली.
दरम्यान अ. भा. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक प्रा. श्याम मानव हे जुलैमध्ये होणाऱ्या कार्यक्रमात पुरस्कार स्वीकारणार आहे. यावेळी ‘चळवळ : काल, आज आणि उद्या व जादुटोणा विरोधी कायदा’ यावर प्रा. मानव यांची चार दशकांचा आढावा घेणारी दीर्घ मुलाखत घेतली जाणार आहे. या चळवळीने अनेक डोळस व विज्ञानवादी पिढ्या घडविल्या असून महाराष्ट्र आणि अन्य राज्यात अंधश्रद्धा पसरवून लोकांचे शोषण करणाऱ्यांचा भंडाफोड केला आहे.
डॉ. गिरीश गांधी राष्ट्रीय सामाजिक कार्य पुरस्काराची सुरुवात २०१३ मध्ये करण्यात आली. दिल्लीचे ज्येष्ठ गांधीवादी डॉ. एस. एन. सुब्बाराव, पुण्याचे ज्येष्ठ समाजवादी विचारवंत डॉ. कुमार सप्तर्षी, दिल्लीचे कर्मयोगी रवी कालरा, धारणी मेळघाटचे ज्येष्ठ समाजसेवक डॉ. रवी कोल्हे आणि डॉ. स्मिता कोल्हे, गुवाहाटीच्या अर्थतज्ज्ञ डॉ. अलका सरमा, सरहदचे संस्थापक संजय नहार, गडचिरोलीतील कुरखेडा येथे आदिवासींसाठी काम करणारे डॉ. सतीश गोगुलवार आणि शुभदा देशमुख, आदिवासी बहुल असलेल्या किनवट येथे आदिवासींच्या आरोग्याची सुश्रूषा करणारे डॉ. अशोक बेलखोडे आणि जोधपूरचे ऑस्टियोपॅथ डॉ. गोवर्धनलाल पाराशर यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.