आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दहावीच्या परीक्षेत यश:वडिलांना आधार देत सृष्टीने दाखवली यशाची दृष्टी ; शाळेशी ऑनलाइन राहिली ‘कनेक्ट’

अमरावती12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ऐन दहावीत असताना एकीकडे कोरोना, तर दुसरीकडे आईला कॅन्सरसारखा असाध्य आजार. परिणामी वडिलांना काय करावे, कसे करावे, ही चिंता. तर आईची शुश्रूषा करणे हे परम् कर्तव्य असल्याने सृष्टीची शाळेतील अनुपस्थिती. परंतु अशा परिस्थितीतही तिने अभ्यासाची साथ सोडली नाही. दवाखान्यात राहून, प्रसंगी प्रवासात पुस्तके वाचून तिने ऑनलाइन शाळेचा ‘कनेक्ट’ कायम ठेवला, त्याची परिणती एसएससी परीक्षेत ८७.४० टक्के गुण मिळण्यात झाली.

ही संघर्ष गाथा आहे, धामणगाव रेल्वे तालुक्यातील झाडगाव चिंचोली येथील क्रांतिकारी शाहीर धम्मा खडसे यांच्या मुलीची. या वर्षभराच्या काळात सृष्टी खडसेने आईचे निधन आणि वडिलांची झालेली द्विधा मनस्थिती अशा परिस्थितीतही दहावीच्या परीक्षेत उत्तुंग यश प्राप्त केले. त्यामुळेच तिचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. डोंगराएवढे दु:ख बाजूला सारुन तिने सातत्याने अभ्यास केला. आईचा दीर्घकाळाचा उपचार नागपुरात सुरु असल्याने तिला वारंवार गावाहून ये-जा करावी लागे. त्यामुळे इतरांना कोरोनामुळे तर कोरोना नसताना शाळा सुरु झाल्यावरही सृष्टीला आईच्या आजारपणामुळे शाळेत जात आले नाही. तरीही शिक्षकांच्या संपर्कात राहून तिने अभ्यासाची कास कायम ठेवली.

झाडगाव चिंचोली हे अमरावती जिल्ह्यातील गाव असले तरी वर्धा जिल्ह्यातील पुलगावहून जवळ असल्याने तिचा दहावीचा प्रवेश पुलगावच्या कृष्णतायल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात होता. या शाळेची ती सर्वात हुशार मुलगी होती, असे तिचे शिक्षक सांगतात. परंतु आईच्या आजारपणामुळे तिला थोडे कमी गुण मिळाले, त्यामुळे ती शाळेत तिसऱ्या क्रमांकावर आहे. परंतु ज्या परिस्थितीत तिने हे यश खेचून आणले, त्या परिस्थितीत दुसरी विद्यार्थीनी कदाचित परीक्षा देऊ शकली असती, असेही तिच्या शिक्षकांनी स्पष्ट केले. नागपुरात असताना बेझनबागमधील कॉम्रेड दिलीप तायडे यांच्या घरुन सृष्टी दवाखान्यात ये-जा करायची. पण या वेळातही तिचा दहावीचा अभ्यास सुरुच होता, असे दिलीप तायडे यांचे निरीक्षण आहे. आईच्या आजाराचे डोंगराएवढे दु:ख गिळून तिने कधी त्याचा बाऊ केला नाही किंवा अभ्यासात त्याचा व्यतयही येऊ दिला नाही.

बातम्या आणखी आहेत...