आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केतकीला विनाकारण अडकवले!:चित्रा वाघ यांची भूमिका, म्हणाल्या- सुप्रिया सुळेंचा अपमान होतो, अन्य महिलांचा होत नाही का?

अमरावती5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याविषयी राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार जे आक्षेपार्ह बोलले त्याचे मी समर्थन करणार नाही. उलट कोणत्याही महिलेचा असा अपमान व्हायला नको, असे माझे मत आहे. परंतु, सुळे यांना कोणी काही बोलले तर त्यांचा अपमान होतो. मग, इतर महिला काय रस्त्यावर पडल्या आहेत काय? त्यावेळी कोणी काहीच कसे बोलत नाही, असा संतप्त सवाल अमरावती येथे गुरुवारी (ता. 10) रोजी पत्रकारांशी संवाद साधताना भाजप महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी विचारला.

त्या अमरावतीत भाजप महिला मेळाव्याला उपस्थित राहण्यासाठी आल्या आहे. तत्पुर्वी श्रमिक पत्रकार भवनात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी भाजप प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी, जिल्हाध्यक्षा निवेदिता चौधरी, शहर अध्यक्ष किरण पातुरकर, संगीता शिंदे तसेच इतर महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.

केतकी चितळेला तुरुंगात टाकले

चित्रा वाघ म्हणाल्या, महाविकास आघाडी सरकारने शहानिशा न करताच केतकी चितळेला एक महिना तुरुंगात टाकले. तिच्या आई-वडिलांना जाऊन भेटल्यानंतर त्यांची अवस्था मला बघवत नव्हती. वास्तविक केतकीने ते लिहिलेच नव्हते. तिला यात अडकविण्यात आले. स्वप्ना पाटकर तर कोणत्याही राजकीय पक्षाच्या नव्हत्या. त्यांना किती घाणेरड्या शिव्या देण्यात आल्या. त्यावेळी महाराष्ट्राचा अपमान झाले असे कोणी म्हटले काय?

आम्ही नौटंकी करीत नाही

चित्रा वाघ म्हणाल्या, कंगना रनौतचे घर पाडण्यात आले. त्यानंतर ‘उखाड के फेक दिया’ असे म्हटले गेले. तेव्हा सर्व शांत होते. आम्ही नौटंकी करीत नाही. आम्हालाही शिव्या दिल्या जातात. त्रास दिला जातो, असे त्यांनी सांगितले. ​​​​​​

तांत्रिक बाबी तपासाव्या

केतकीचे तुम्ही समर्थन करता काय असे वाघ यांना विचारल्यानंतर त्यांचा आवाज काहीसा चढला. ती पोस्ट केतकीने लिहली होती काय? या तांत्रिक बाबीही तुम्ही तपासत जा. तुमच्या घरातील एखाद्या व्यक्तीला फेसबुक पोस्टमुळे तुरुंगात टाकले तर तुमची भुमिका काय असेल. आपल्याकडे व्यक्तिस्वातंत्र्य आहे की नाही, असेही त्या म्हणाल्या.

संजय राठोड यांच्याविरोधात माझी 'पीआयएल'

महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री असताना संजय राठोड यांनी पूजा चव्हाण या युवतीची हत्या केल्याचा त्यांच्यावर आरोप होता. या वेळी महाविकास सरकारच्या दडपणात विशेषत: तत्कालिन गृहमंत्री व पुण्याच्या पोलीस आयुक्तांनी या प्रकरणी एफआयआरच दाखल केला नाही. या विरोधात मी त्यावेळी न्यायालयात पीआयएल दाखल केली. सध्या शिंदे-फडणवीस सरकारमध्ये संजय राठोड मंत्री असले तरी माझी भुमिका बदलली नाही, असेही वाघ यांनी स्पष्ट केले.

बातम्या आणखी आहेत...