आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअमरावती येथील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी स्थापन केलेल्या ‘स्वामी विवेकानंद-भारतरत्न डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम युवा मंच’ या संस्थेतर्फे उद्या, गुरुवार, २६ जानेवारीपासून ‘उत्सव कल्पनांचा’ सुरु होत आहे. प्रजासत्ताक दिनापासून सुरु होणारा हा उत्सव जागतिक विज्ञान दिनापर्यंत म्हणजेच महिनाभर चालेल, अशी माहिती मंचचे मार्गदर्शक प्रा. दिनेश सूर्यवंशी यांनी आज, बुधवारी एका पत्रकार परिषदेत दिली.
जागतिक नकाशात नागपुर मध्यभागी आहे. तेथून अमरावती दीडशे किलोमीटर अंतरावर असल्याने थोड्याफार फरकाने अमरावतीदेखील जगाच्या मध्यभागीच येते. त्यामुळे या ठिकाणाहून सुरु होणाऱ्या या अभिनव उपक्रमाला भविष्यात एक वेगळेच महत्व प्राप्त होईल, असा आयोजक संस्थेचा अंदाज आहे.
प्रा. सूर्यवंशी यांच्या मते अमरावती हे पुण्यानंतर शिक्षणात आघाडीवर असलेले शहर आहे. आयुर्वेदातील संशोधनासाठी अत्यंत उपयुक्त असा मेळघाट याच जिल्ह्यात आहे. महान संतांची परंपरा, पहिल्या महिला राष्ट्रपतींचे शहर अशा अनेक महत्वाच्या बाबीसुद्धा या शहराभोवतीच फिरतात.
हे सगळे वैभव असतानाच या शहरातील नागरिकांकडे कल्पनाही विपुल आहेत. परंतु त्या माहित करुन घेत त्याचा विनियोग करण्याचा प्रयत्न अद्याप झाला नाही. त्यामुळे सदर उत्सवांतून या सर्वांच्या कल्पना एकत्रित करायच्या आणि त्याचा योग्य वापर करायचा, असे संस्थेने ठरविले आहे. विशेष असे की कल्पना देणाऱ्यांना लाखो रुपयांची बक्षिसेही देण्यात येणार आहेत.
यासाठी सदर संस्थेने कार्तिक शेळके यांची संयोजक तर लक्ष्मी भंडारी यांची सहसंयोजक म्हणून निवड केली आहे. पत्रकार परिषदेला युवा मंचचे इतर पदाधिकारी आकाश दुधकोर, शुभम राठोड, मयुर येवतकर, साहिल किरणे, अभय ताले आदी उपस्थित होते.
११ फेब्रुवारीला व्यापक बैठक
या उपक्रमासाठी आगामी ११ फेब्रुवारी रोजी सर्व क्षेत्रातील नामवंतांची एक व्यापक बैठक घेतली जाणार आहे. या बैठकीमध्ये संस्थेची संपूर्ण भूमिका आणि भविष्यातील वाटचालही लोकांपुढे मांडली जाईल. शिवाय त्यांच्याकडून येणाऱ्या सूचनांचा पूर्ण आदर करुन या अभियानाला खऱ्या अर्थाने लोकअभियानात बदलून देशाची आर्थिक सुबत्ता वाढविण्यासाठी सुरु असलेल्या प्रयत्नांना हातभार लावला जाणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.