आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशिक्षकांच्या बदल्यांमध्ये यावर्षी ‘सहावा टप्पा’ या नावाखाली एक अतिरिक्त नियम लागू केल्यामुळे अमरावतीत विचित्र स्थिती निर्माण झाली आहे. या नव्या घडामोडीमुळे जिल्ह्याच्या विविध शहरांतून तब्बल 306 शिक्षकांच्या बदल्या मेळघाटात झाल्या आहेत.
त्यामुळे शहरांतील शाळांमध्ये शिक्षकांची संख्या रोडावली असून तेथील विद्यार्थ्यांचे भवितव्य अडचणीत आले आहे. दुसरीकडे जे शिक्षक गेल्या अनेक वर्षांपासून मेळघाटात आहेत, त्यांच्याही परतीचे दोर कापले गेले आहेत. परिणामी 52 शिक्षकांनी न्यायालयाचे दार ठोठावून स्थगनादेश प्राप्त केला असून आणखी अनेक जण त्या मार्गावर आहेत.
या नव्या संकटामुळे जिल्हा परिषद प्रशासनासमोर मोठा पेच निर्माण झाला असून दोन दिवसांवर येऊन ठेपलेले बदली तथा नव्या नियुक्तीचे आदेश बजवायचे कसे, असा यक्ष प्रश्न निर्माण झाला आहे. जिल्हा परिषद प्रशासनातर्फे गेल्या महिन्यात शिक्षकांच्या बदलीचे सत्र राबविण्यात आले. साडे तीन हजार शिक्षकांपैकी सातशेवर शिक्षक वेगवेगळ्या संवर्गात बदलीपात्र ठरले होते.
या सर्वांना ऑनलाइन प्रक्रियेमार्फत सदर अभियानात भाग घ्यावा लागला. टप्पा एक ते टप्पा सहा अशी त्यासाठीची साखळी होती. परंतु यातील तिसरा टप्पा जो मेळघाटातील शिक्षकांना इतरत्र बदली मिळवून देण्यासाठी सहाय्यभूत ठरणार होता, तो काहीसा गहाळ करण्यात आला. त्यामुळे नागरी (शहरी भाग) क्षेत्रातील शिक्षकांना परत त्याच क्षेत्रात बदली मिळाली. याऊलट डोंगरी (मेळघाट) क्षेत्रातील शिक्षक चार ते पाच वर्षांची सेवा पूर्ण झाल्यानंतरही त्याच भागात अडकले.
हे सर्व सुरु असतानाच आणखी एक आश्चर्यकारक बाब घडली, ती म्हणजे सहावा टप्पा पूर्णपणे अंमलात आणला गेला. या टप्प्यामुळे थेट 306 शिक्षकांची मेळघाटात बदली केली गेली. सामान्यत: एकदा मेळघाटातील सेवेचा कालखंड पूर्ण करुन परतलेल्या शिक्षकांना पुन्हा त्या भागात पाठविले जात नाही. शिवाय स्वत: अथवा कुटुंबातील सदस्यांच्या गंभीर आजारपणामुळे व्यग्र राहणाऱ्या शिक्षकांनाही त्या भागात पाठविण्यापासून सूट दिली जाते. एवढेच काय तर वयाची 53 वर्षे पूर्ण करणाऱ्यांनाही मेळघाट आणि इतरत्र बदलीमध्ये सोईचे ठिकाण निवडण्याची संधी दिली जाते. परंतु नव्याने अंमलात आलेल्या सहाव्या टप्प्यामुळे या साऱ्याच सवलती गहाळ झाल्या असून थेट बदली आदेशच हातात पडले आहेत.
त्यामुळे शिक्षक कमालीचे बेचैन झाले असून त्यापैकी 44 जणांनी मेळघाटात बदली का केली, या सबबीवर तर 8 शिक्षकांनी आम्ही किती काळ मेळघाटातच काम करायचे असा युक्तीवाद करीत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपुर खंडपीठात धाव घेत स्थगनादेश प्राप्त केला. पुढे या 52 शिक्षकांचेच अनुकरण करीत काहींनी व्यक्तिगत पातळीवर तर काहींनी सामुहिकरित्या न्यायालयात याचिका दाखल केली असून तेही न्यायाची मागणी करीत आहेत.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.