आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदोलन:शिक्षकांचे चक्क ‘उठाबशा’ आंदोलन ; दुर्गममधून बदलीच्या मागणीसाठी अनोखे धरणे

अमरावतीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नियमबाह्य बिंदुनामावली आणि दुर्गम क्षेत्रातून सुगम क्षेत्रात बदलीच्या मागणीसाठी आज, सोमवारी जिल्हा परिषदेसमोर अनोखे धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनांतर्गत त्रस्त शिक्षकांनी चक्क उठाबशा काढल्या. राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाशी संलग्न प्रहार शिक्षक संघटनेच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. जिल्हा परिषदेमधील शिक्षक संवर्गाची बिंदुनामावली ही नियमबाह्य असून गेल्या दोन वर्षात दुर्गम क्षेत्राबाहेरील (नॉन पेसा) मागासवर्गीयांचे आरक्षण चुकीच्या पद्धतीने हिरावून घेण्यात आले आहे. याबाबत शासनाकडून दुरुस्तीचे आदेश देण्यात आल्यानंतरही त्या आदेशाची अंमलबजावणी करण्यात आली नाही, असे संघटनेचे म्हणणे आहे. त्यामुळे आगामी ९ जूनपासून बदलीचे पोर्टल सुरु होत असले तरी त्याचा लाभ अमरावती जिल्ह्याला होणार नाही. किंबहुना बिंदुनामावलीचा घोळ अद्याप संपुष्टात न आल्यामुळे पोर्टल सुरुच होणार नाही, असे संघटनेचे राज्य अध्यक्ष महेश ठाकरे यांनी ‘दिव्य मराठी’ला सांगितले. आंदोलनादरम्यान शिक्षकांनी उठाबशा काढून ‘झेडपी’ प्रशासनाविरुद्ध संताप व्यक्त करीत जिल्हा परिषद प्रशासनासह शिक्षण विभागाच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. तआंदोलनाअखेर सीईओ अविशांत पंडा यांना निवेदन देऊन तात्काळ कार्यवाहीची मागणी करण्यात आली. त्याचवेळी ८ जूनपासून विभागीय आयुक्तालयासमोर बेमुदत धरणे व उपोषण आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशाराही देण्यात आला. आंदोलनात महेश ठाकरे यांच्यासह जिल्हाध्यक्ष शरद काळे, सरचिटणीस अमोल वऱ्हेकर, संघटक दिलीप इंगळे, गजानन पाथरे, सूरजकुमार सोनटक्के, किरण वानखडे, सारंग धामणकर, अविनाश मोहोड, पंकज ठाकुर, दिनेश मेटकर, रमेश कडू यांच्यासह बदली ग्रस्त अनेक शिक्षक सहभागी झाले होते.

८ पासून आयुक्तालयासमोर बेमुदत धरणे याच मागणीसाठी आगामी ८ जूनपासून विभागीय आयुक्त कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले जाणार आहे. शिक्षक संवर्गाच्या नियमबाह्य बिंदूनामावलीबाबत सामान्य प्रशासन विभागाने विभागीय आयुक्त आणि जिल्हा परिषदेचे सीईओ यांना नियमबाह्य बिंदुनामावलीची तपासणी करून, नियमानुसार बिगर पेसामधील आरक्षण अबाधित ठेवण्याचे आदेश दोन वर्षाआधी दिले होते. परंतु त्यानुसार अजूनही कारवाई झाली नाही म्हणून ८ जूनपासून आयुक्तालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.

बातम्या आणखी आहेत...