आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोठी बातमी:वाळू विक्रेत्यांमधील क्षुल्लक वादातून मोर्शीत दोन गटात तणाव, मुख्य जयस्तंभ चौकातील घटना

अमरावती2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अवैध रेती व्यवसायिकांमधील आपसांतील क्षुल्लक वादातून मोर्शीत काही काळ दोन गटात तणाव झाला. क्षुल्लक कारणाच्या आपसी वादातून शहरामध्ये काही काळासाठी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. येथील अवैध व्यावसायिक अगदी राजरोसपणे वागतात. त्यांच्या अशा वागण्यामुळेच आजचा अप्रिय प्रसंग उद्भवला.

या आपसी वादाने पुढे दोन गटात तणाव निर्माण होऊन त्याचे परिणाम सामान्य जनतेला भोगावे लागतात की काय ? अशी भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था राखणाऱ्या यंत्रणांचे कान टवकारले असून त्यांनी योग्य ती खबरदारी घेण्यासाठी पावले टाकली आहेत.

रात्रीचे सुमारास येथील मुख्य जयस्तंभ चौकात रेती व्यवसायिकांमध्ये आपसी वाद झाला. या वादातून दोन गट आमने-सामने आल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर या वादाचे लोण पेठपुरा परिसरातसुद्धा पोहोचले. तेथे विशिष्ट समाजाचा जमाव मोठ्या प्रमाणात एकत्र आल्याने परिस्थिती तणावग्रस्त झाल्याचे परिसरातील नागरिकांनी सांगितले. गेल्या काही दिवसांपासून शहरात अनिर्बंध फोफावणारे अवैध व्यवसाय, सातत्याने व सुसाट वेगाने होणारी जनावरांची अवैध वाहतूक तसेच दिवसागणिक निर्माण होणारे नवनवीन रेती माफिया आणि त्यांच्या आपसी वादातून वारंवार बिघडणारे शहरातील वातावरण असे दुष्टचक्र शहरवासियांच्या वाट्याला येत आहे.

हे चक्र शहर स्वास्थ्याच्यादृष्टीने अत्यंत धोकादायक असून पोलीस प्रशासन मात्र यावर अंकुश ठेवण्यात अपयशी ठरत असल्याचे दिसून येते. भविष्यात याची परिणीती मोठ्या वादात होऊन शहराचे स्वास्थ्य बिघडते की काय ? अशी भीती सामान्य जनता व्यक्त करीत आहे. जिल्हा प्रशासनाने यात पुढाकार घेऊन यावर तात्काळ निर्बंध लावणे गरजेचे आहे. अन्यथा शहरातील निष्पाप जनतेला याचे दुष्परिणाम भोगावे लागतील. दरम्यान मोर्शी शहर तसेच तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये फोफावणारे हे अवैध व्यवसाय कोणाच्या (नेत्याच्या की अधिकाऱ्याच्या) आशीर्वादाने सुरू आहे ? याचा सुद्धा शोध घेणे गरजेचे आहे. जेणेकरून शहराचे स्वास्थ्य तसेच शहरातील जातीय एकोपा अबाधित राहून सर्वसामान्यांचे जीवन सुरक्षित राहू शकेल, असाही जनतेचा सूर आहे.