आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तीन महिलांविरुद्ध गुन्हा:लिफ्ट घेणाऱ्या महिलेसह तिघींनी 60 वर्षीय व्यक्तीला बाथरूममध्ये डांबले

अमरावती3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

रस्त्याने दुचाकी घेऊन जाणाऱ्या एका ६० वर्षीय व्यक्तीला एक महिलेने तिच्या दुचाकीचे पेट्रोल संपले म्हणून लिफ्ट मागितली. त्याने लिफ्ट दिली तसेच महिलेच्या मागणीवरून ४०० रुपये उधारही दिलेत. त्यानंतर ही रक्कम परत घेण्यासाठी महिलेने फ्लॅटवर बोलावले. त्या ठिकाणी अन्य दोन महिला आल्यात. या तिघींनी व्यक्तीला मारहाण केली तसेच ६० हजार रुपये खंडणी मागितली. न दिल्यास बलात्कार व विनयभंग केल्याची खोटी तक्रार देण्याची धमकी दिली. हा धक्कादायक प्रकार शहरात घडला असून, ६० वर्षीय व्यक्तीने प्रचंड घाबरलेल्या स्थितीत शुक्रवार, २६ ऑगस्टला गाडगेनगर पोेलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी २६ ऑगस्टला उशिरा रात्री तीन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

नंदकिशोर जगन्नाथ भडांगे (६०, रा. व्हीएमव्ही रोड, अमरावती) असे तक्रारदार व्यक्तीचे नाव आहे. नंदकिशोर भडांगे हे मजुरी काम करतात. १७ ऑगस्टला ते दुचाकीने जात असताना गाडगेनगर पोलिस ठाणे रस्त्यावर त्यांना एका महिलेने तिच्या दुचाकीमधील पेट्रोल संपले असे सांगून लिफ्ट मागितली. भडांगे यांनी तिला लिफ्ट दिली. तिला पेट्रोल घेण्यासाठी १०० रुपये व नंतर ३०० रुपये असे एकूण ४०० रुपये तिच्या मागण्यावरून दिले. तसेच भडांगे यांना मोबाइल क्रमांक मागितला कारण मी फोन करून तुम्हाला पैसे परत करेल, असेही तिने सांगितले. दरम्यान २१ ऑगस्टला सायंकाळी ४ च्या सुमारास त्याच महिलेने भडांगे यांना फोन करून नवसारी परिसरातील वानखडे यांच्या चक्कीजवळ असलेल्या फ्लॅट स्किममध्ये बोलावले.

भडांगे त्या ठिकाणी पोहाेचले असता या महिलेने त्यांना आत घेऊन फ्लॅटचा दरवाजा बंद केला. भडांगे यांनी मी बाहेर थांबतो असे म्हटले असता माझी बहीण पैसे घेऊन १० मिनिटांत येत आहे, असे म्हटले. त्यानंतर दोन महिला त्या फ्लॅटवर आल्या, त्यांनी आतमध्ये येताच फ्लॅटचा दरवाजा आतून बंद केला. भडांगे यांनी दरवाजा उघडा, मला बाहेर जाऊ द्या, असे म्हटले तर त्यांनी दरवाजा न उघडता तिघींनीही लाथा बुक्क्यांनी त्यांना मारहाण सुरू केली. तसेच ६० हजार रुपये दे. ही रक्कम दिली नाही तर तुझ्याविरुद्ध बलात्कार आणि विनयभंगाची तक्रार देईल, असेही बजावले. त्यानंतर तिघींनींही भडांगे यांना ढकलून बाथरूममध्ये नेले व एक तास डांबून ठेवले. त्यावेळी स्वत:चा बचाव करण्यासाठी भडांगे यांनी तीन दिवसांची मुदत मागून पैशांची व्यवस्था करतो, असे सांगितले. त्यानंतर कॉलर पकडूनच बाथरुममधून बाहेर काढले व त्यांना तिघींनीही घराबाहेर काढून दिले. त्यानंतर तीन दिवसांनी पुन्हा अनोळखी क्रमांकावरून भडांगे यांना कॉल आले, मात्र त्यांनी रिसिव्ह केले नाहीत.

त्यानंतर मात्र २५ ऑगस्टला दुपारी दोन महिला थेट भडांगे यांच्या घरी गेल्या. त्यावेळी भडांगे घरी नव्हते. भडांगे यांच्या पत्नीसोबत त्या महिलांनी वाद घालत त्यांना मारहाण केली. दरम्यान त्यांच्या पत्नीने आरडाओरड केली असता शेजारी राहणारा एक तरुण धावत गेल्यानंतर या दोन्ही महिला दुचाकी घेऊन पळून गेल्या, असे भडांगे यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे. या प्रकरणी गाडगेनगर पोलिसांनी तिन्ही महिलांविरुद्ध खंडणी मागणे, घरात अनधिकृतपणे प्रवेश करणे, जीवे मारण्याची धमकी देणे व अन्य कलमान्वये गुन्हा दाखल केला.

बातम्या आणखी आहेत...